भाजपा म्हणजे राजकारणातील 'सिरियल किलर'; संजय राऊतांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 11:24 AM2023-07-04T11:24:42+5:302023-07-04T11:25:48+5:30
"भाजपाएवढे भ्रष्टाचाराचे खुले समर्थन कुणीही केलेले नाही"
Sanjay Raut vs BJP: एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत फुटलेल्या लोकांच्या डोक्यात शिवसेना हे नाव आणि चिन्ह वापरण्याचा विचार नव्हता. हे भाजपाच्या दिल्लीतील लोकांचे डोकं होतं. त्यांच्या डोक्यात ही गोष्ट भाजपाने भरवली आणि त्यांना असे करण्यास भाग पाडले. तीच पद्धत त्यांनी राष्ट्रवादीच्या फुटीच्या बाबतीत अवलंबली आहे. राष्ट्रवादी फुटली. त्याच वेळी त्यांनी प्रमुख लोकांना हाताशी धरून आम्ही खरे राष्ट्रवादी असे सांगून त्यांच्या पक्षावर व चिन्हावर दावा करायला लावला. भाजपा हे राजकारणातील सिरियल किलर व सिरीयल रेपिस्ट आहेत.
स्वत: काहीही करायचं नाही. केवळ दुसऱ्या पक्षातील लोकांना फोडून आपला स्वार्थ साधायचा असा प्रकार सुरू आहे. भाजपाने आधी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे हे नाव संपवण्याचा प्रयत्न केला. आता ते शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक इतिहास घडवत नाहीत ते दुसऱ्यांचे इतिहास नष्ट करण्याचे प्रयत्न करत असतात. पण कितीही प्रयत्न केला तरी त्यांनी तसे करता येणार नाही. बाळासाहेबांचा, शरद पवारांचा इतिहास पुसला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा संजय राऊत यांनी भाजपाला दिला.
भाजपाला ऑपरेशन लोटस जमलेलं नाही, उलट त्यांचेच ऑपरेशन झाले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी आपापल्या जागी स्थिर राहिल. देशात भाजपाचे प्रतिष्ठेचे वस्त्रहरण झाले आणि त्यांची वैचारिक सुंता झाली आहे. भ्रष्टाचाराचे खुलं समर्थन आणि खुली प्रतिष्ठा यांच्याइतकी कुणीही दिली नव्हती. तुम्ही आमची कितीही लोकं फोडलीत तरी मुंबईवर आमचा भगवाच फडकणार, असं राऊत म्हणाले.
गुलाम हा नेहमी गुलामच असतो!
अजित पवारांच्या सत्तेतील समावेशाने एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट नाराज आहे असं वाटतं का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, गुलाम हा कायम गुलामच असतो. त्याच्या नाराजीला काहीही किंमत नसते. त्याला कधीही नाराज होण्याचा अधिकार नसतो त्यामुळे त्याची चिंता नाही, असा खोचक टोला राऊतांनी लगावला.