Join us

'संजय राऊत आमच्यासाठी चिलखत'; सुषमा अंधारेंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 7:15 PM

शिवसेना ठाकरे पक्षाकडून संजय राऊत आणि सुषमा अंधारे खिंड लढवत आहेत.

मुंबई - महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन वाद सुरू असतानाच वंचित बहुजन आघाडीकडूनही महाविकास आघाडीतील मतभेदावर भाष्य केलं जात आहे. संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात महाविकास आघाडीतील वंचितच्या सहभागावरुन वाकयुद्ध सुरू आहे. संजय राऊतांनी पाठित खंजीर खुपसला असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. त्यानंतर आज पुन्हा आंबेडकरांनी राऊतांवर निशाणा साधला. तर, संजय राऊतांनीही प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत-आंबेडकर वादात आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही उडी घेतली असून संजय राऊतांच्या समर्थनार्थ त्यांनी प्रकाश आंबेडकरांना सवालही केला आहे. 

शिवसेना ठाकरे पक्षाकडून संजय राऊत आणि सुषमा अंधारे खिंड लढवत आहेत. संजय राऊत महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेत मोलाची भूमिका निभावत आहेत. तर, सुषमा अंधारे याही पक्षाची बाजू मांडताना सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत आहेत. आता, महाविकास आघाडीत सहभागी न झाल्याच्या मुद्द्यावरुन प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर, संजय राऊत यांनीही पलटवार केला. आता या वादात सुषमा अंधारे यांनी संजय राऊतांची बाजू घेत आंबेडकरांना प्रश्न विचारले आहेत. ''संजय राऊत आमच्या पक्षासाठी चिलखत आहेत, आम्ही १०० पाऊलं पुढे चाललोय, पण तुम्ही किमान आहे त्या जागेवर तरी थांबा, असा टोलाही त्यांनी लगावला. 

मुंबईला जी सभा झाली तिथे वंचितने उद्धव ठाकरे यांना निमंत्रण का दिलं नाही? काँग्रेसशी पटत नाही, पण त्यांना तुम्ही बोलावलं. आम्ही आधी ४ जागा दिल्या, नंतर ५ जागा दिल्या होत्या. आम्ही १०० पावलं चाललो, तुम्ही आहे त्या जागेवर तरी थांबा. तुम्ही मागे जात असाल तर ही कसली दोस्ती?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी वंचितच्या प्रकाश आंबेडकरांना विचारला आहे. तसेच, संजय राऊतांची बाजू घेत, संजय राऊत हे आमचं चिलखत आहेत, असेही त्यांनी म्हटले.

संजय राऊतांनी मांडली भूमिका

वंचित बहुजन आघाडीला पहिल्यापासून सन्मानानेच वागवले. वंचितला ४ जागांचा प्रस्ताव होता. बंद दाराआडच्या चर्चा आम्ही बाहेर करत नाही. अकोल्यासह ३ जागांचा प्रस्ताव होता. आमची विद्यमान रामटेकची जागाही द्यायला तयार होतो. काँग्रेसकडून चांगली जागा देण्याची तयारी होती. चर्चा माझी आणि प्रकाश आंबेडकरांची नव्हती. चर्चा महाविकास आघाडीशी होती असं प्रत्युत्तर संजय राऊतांनीप्रकाश आंबेडकर यांच्या टीकेवर दिले आहे. जे संविधान संपवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांना अप्रत्यक्ष मदत होईल असं कुणी वागू नये या मताचे आम्ही आहोत. ४ जागांचा प्रस्ताव होता. चर्चा अत्यंत चांगल्या वातावरणात झाली.

काय म्हणाले होते प्रकाश आंबेडकर?

महाविकास आघाडी वेगळी आहे आणि संजय राऊत वेगळे आहेत. ज्यांना आम्ही लक्ष्य केले ते संजय राऊत होते. संजय राऊत चुकीचे वक्तव्य करतात म्हणून आम्ही म्हणालो की, संजय हे आघाडीत बिघाडी करत आहेत. मविआकडून तीन जागांपलीकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आम्हाला मविआने तीन जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यात एक अकोला आणि दुसऱ्या दोन जागा यापलीकडे आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं.  

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामहाविकास आघाडीसुषमा अंधारेप्रकाश आंबेडकर