Sanjay Raut vs BJP: मुंबईतील गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १० अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. त्यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर अखेर संजय राऊत हे तपासात सहाकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत ईडीने त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती प्रसारमाध्यमांनी दिली. संजय राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांची ईडीच्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली. त्यानंतर अखेर राऊतांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना चांगलाच टोला लगावला.
संजय राऊत यांना पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडीने एकूण चार वेळा बोलावले होते. त्यापैकी तीन वेळा त्यांनी चौकशीला जाणे टाळले. त्यामुळे अखेरीस आज ईडीने राऊतांच्या घरीच छापा टाकला. तशातच गेल्या दोन दिवसात संजय राऊत यांच्याबाबत आणखी एक तथाकथिक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेशी संजय राऊत यांनी अतिशय अर्वाच्च भाषेत फोनवरून संवाद साधल्याची तथाकथित ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. त्यावर संजय राऊत यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर आता त्यांनी ईडीने ताब्यात घेतले. त्यावर, भाजपाचे अतुल भातखळकर यांनी ट्वीट केले. "कर्म सिध्दांत.. करावे तसे भरावे.. राऊतांचे लंका दहन झाले... म्हणून म्हणतात महिलांचे तळतळाट घेऊ नये", असे ट्वीट भाजपाच्या भातखळकर यांनी केले.
दरम्यान, संजय राऊत यांना जवळपास १० तासांच्या चौकशीनंतर घराबाहेर आणण्यात आले आणि पोलीस व सीआरपीएफच्या सुरक्षेमध्ये ईडी कार्यालयाकडे घेऊन गेले. संजय राऊतांना ताब्यात घेत असताना शिवसेनेचे कार्यकर्तेदेखील आक्रमक झाले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. संजय राऊत यांना घरातून बाहेर नेताना संजय राऊतांच्या मातोश्री, त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि त्यांच्या भगिनी सर्व जण घराच्या खिडकीत उभ्या असल्याचे दिसले. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाल्याचे दिसले.