Ashish Shelar slams Sanjay Raut मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर, भाजपाचे आमदार आशिष शेला यांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. "ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, ज्यांनी गोरेगाव मधील ६७२ मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून केला, ज्यांच्या हातांना ६७२ मराठी माणसाच्या घरांच्या स्वप्नांच्या खूनाचे रक्त लागलेय अशा उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांची चौकशी सुरु आहे. ही सूडबुद्धीने केलेली कारवाई नाही, तर मराठी माणसाला फसवणाऱ्यांची सडकून, सडेतोड केलेली चौकशी आहे", असे रोखठोक मत शेलार यांनी व्यक्त केले.
"गोरेगावच्या पत्रा चाळीतील ६७२ मराठी कुटुंबांच्या घरांच्या स्वप्नांचा खून करण्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा थेट संबंध दिसून आला आहे. शासनाच्या जागेचा अपव्यय करण्यात आला, म्हाडाची मालकीची जमीनीवर अनधिकृतपणे तिसऱ्या माणसाचा मालकी हक्क निर्माण करणे, १ हजार ३९ कोटी रुपयांचा अपव्यय करणे, ६७२ मराठी कुटुंबांना घरे खाली करण्यासाठी मनी, मसल पॉवरचा वापर करणे, त्यासाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मदत करणे, नवीन बांधकामात घरे देतो असे सांगून १३८ कोटी रुपये गोळा करून त्याचा अपव्यय करणे, त्यासाठी पुन्हा युनियन बँक ऑफ इंडिया कडून १०० कोटींचे आणि ILFS कडून २१५ कोटींचे कर्ज घेऊन ठेवीदारांच्या पैशाचा अपव्यय करणे, त्यानंतरही प्रकल्प पूर्ण न करणे अशा गंभीर स्वरूपाचे हे प्रकरण असून हा व्हाईट कॉलर गुन्हा आहे", असे सांगत शेलारांनी पत्राचाळ गैरव्यवहाराचा पाढाच वाचला.
"१ कोटी आणि ६० लाख रुपये संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या खात्यात आलेले दिसत आहेत. मग रोख स्वरुपात किती आले? या पैशातून अलिबागला जमीनखरेदी करताना रोखीने व्यवहार केल्याचे सदर जमीन मालकांनी सांगितले आहे. त्यामुळे या सगळ्या शिवसेनेचा थेट सहभाग दिसतोय. खा. संजय राऊत यांचा सहभाग दिसतोय याचा पक्षप्रमुखांनी खुलासा करावा", अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केला. मराठी माणसाचा तथाकथित कैवार घेणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या खासदारांनी हा मराठी माणसांच्या घरांचा जो खून केलाय त्याचे उत्तर द्या, भाजपा अशा अनेक बाबी भविष्यात उघड करेल त्यातील एक पत्रा चाळ हे एक मोठे प्रकरण आहे, असेही शेलार म्हणाले.