Sanjay Raut Arrested: संजय राऊतांच्या वकिलांनी न्यायालयात मांडले 'हे' ३ महत्त्वाचे मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 04:22 PM2022-08-01T16:22:20+5:302022-08-01T16:24:50+5:30
संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी
Sanjay Raut Arrested: शिवसेना खासदार संजय राऊत यांना दीर्घ चौकशीनंतर रविवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. PMLA कोर्टाने संजय राऊतांना ४ ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली. गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. रविवारी सकाळी आधी संजय राऊतांच्या भांडुपच्या निवासस्थानी ईडीने त्यांची तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात आल्यावर तेथेही सुमारे आठ तास चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना 'ईडी'ने अटक केली. त्यानंतर आज राऊतांना कोर्टात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. कोर्टात संजय राऊतांचे वकिल अशोक मुंदरगी यांनी ३ महत्त्वाचे मुद्दे मांडले.
संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्याचे प्रमुख आरोपी आहेत असा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा आरोप ईडीच्या वकिलांनी कोर्टात केला. याच मुद्द्यावर राऊतांना आठ दिवसांची ईडी कोठडी द्यावी अशी मागणी कोर्टाकडे करण्यात आली. पण संजय राऊतांच्या वकिलांनी या मागणीला आणि आरोपांना तीव्र विरोध केला. त्यांनी ३ महत्त्वाचे मुद्दे मांडले.
पहिला मुद्दा म्हणजे, संजय राऊतांवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून ही राजकीय सूडापोटी केलेली ही कारवाई आहे. दुसरा मुद्दा म्हणजे, तपास यंत्रणा असलेली ईडी ही राजकीय दबावाखाली काम करत आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर ही कारवाई केली जात आहे. तर तिसरा मुद्दा म्हणजे, प्रविण राऊत हे व्यापारी आहेत. व संजय राऊत हे स्वत: प्रतिष्ठित व्यक्ती असून त्यांच्या स्वत:च्या काही कंपन्या आहेत, त्यातून त्यांना अधिकृतरित्या पैसे मिळतात. त्यामुळे अशा परिस्थितीत संजय राऊतांना ईडी कोठडी देण्यात येऊ नेय आणि दिलीच तर आठ दिवसांची न देता कमी दिवसांची द्यावी.
दरम्यान, सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १० अधिकाऱ्यांचे पथक राऊतांच्या घरात दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी करण्यात आली. आणि अखेर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संजय राऊतांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर तेथेदेखील त्यांची सुमारे ८ तास ईडी कार्यालयात चौकशी करण्यात आली आणि अखेर त्यांना ईडीने अटक केली. आज सकाळी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात घेऊन जाण्यात आले व त्यानंतर कोर्टात हजर केले असता त्यांना ४ ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी सुनावण्यात आली.