Sanjay Raut Mumbai Court: महाराष्ट्रात जून महिन्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यात भाजपाला महाविकास आघाडीतील मतं फोडण्यात यश आले. त्यानंतर मात्र शिवसेनेला मोठा धक्का बसला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासातले मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यांना शिवसेनेतील ४० तर अपक्ष १० आमदारांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे महाविरास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार राज्यात अस्तित्वात आले. या साऱ्या रणधुमाळीत संजय राऊत हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची बाजू प्रभावी मांडण्याची भूमिका चोख बजावत आहेत. पण तशातच आता राऊतांना न्यायालयाकडून दणका देण्यात आला असून एका प्रकरणात त्यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नक्की काय आहे प्रकरण-
संजय राऊत हे आपल्या आक्रमक शैलीमुळे चर्चेत असतात. मधल्या काळात काही आक्षेपार्ह शब्दांमुळेही ते चर्चेत आले. राऊतांवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काही आरोप केले होते. त्यानंतर राऊतांनी सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर काही आरोप केले. याच संदर्भात किरीट व मेधा सोमय्या यांनी संजय राऊतांवर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. या प्रकरणी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना ६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईतील मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात शौचालय बांधणी कामात सोमय्या यांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत केला होता. तसेच समाजमाध्यमातही यावर तीव्र शब्दांत व काहीसे आक्षेपार्ह शब्द वापरत भाष्य केले होते. राऊत यांनी केलेले हे आरोप तथ्यहीन आहेत, त्यांच्याकडे याबद्दलचे पुरावे नाही असा दावा त्यानंतर सोमय्या यांनी केला. राऊतांच्या आरोपांमुळे प्रचंड मानहानी झाल्याचा दावाही सोमय्या यांनी केला असून राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याच प्रकरणात सोमवारी शिवडी न्यायालयात या दाव्यावर सुनावणी झाली. या वेळी संजय राऊत यांना ६ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दंडाधिकारींनी दिले आहेत.