Join us

फडणवीसांना गांभीर्यानं घेऊ नका, ते पुढील २५ वर्ष वैफल्यग्रस्त राहतील; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 11:08 AM

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीर बोलत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस सरकारच्या दबावाखाली वागत असून लोकशाही पायाखाली तुडवली जाते ही परिस्थिती भयावह असल्याची टीका केली.

मुंबई-

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीर बोलत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस सरकारच्या दबावाखाली वागत असून लोकशाही पायाखाली तुडवली जाते ही परिस्थिती भयावह असल्याची टीका केली. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांना फार गांभीर्यानं घेऊ नका. ते सत्ता गेल्यामुळे वैफल्यग्रस्त झाले आहेत आणि पुढील २५ वर्ष ते वैफल्यग्रस्तच राहतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 

"राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा दावा जर ते करत असतील तर त्याला विरोधी पक्षच जबाबदार आहे. दळभद्रीपणाची आंदोलनं इथं येऊन करायची आणि कायदा व सुव्यवस्थेवर बोट ठेवायचं हे योग्य नाही. एकावर आयएनएस विक्रांतच्या नावावर कोट्यवधींचा निधी लाटल्याचा गंभीर आरोप आहे. तो आरोपी काल एका दुसऱ्या आरोपीची भेट घेतो. खोटं जातप्रमाणपत्र सादर करुन निवडणूक लढवल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात नवनीत राणा यांच्याविरोधात खटला सुरू आहे. मग दोन आरोपींच्या भेटीला इतकं महत्व का द्यायचं? मूळात या आरोपींच्या पाठिशी भाजपानं उभं राहण्याचं कारणच काय? हा माझा फडणवीसांना सवाल आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

सोमय्यांचा शौचालय घोटाळा बाहेर काढणार"किरीट सोमय्यांचा आणखी एक मोठा घोटाळा आता लवकरच बाहेर आणणार आहे. त्यांना कागदपत्र हवी असतात ना आता त्यांच्या तोंडात कागद कोंबू आणि तोंड बंद करू", असं संजय राऊत म्हणाले. भाजपामध्ये हिंमत असेल तर समोर येऊन लढावं. शिवसेना नेहमी समोरुन लढा देणारी संघटना आहे. आम्ही करतो ती आक्रमक भूमिका मग तुमच्या त्या पोलखोल गाड्या तोडल्या तेव्हा तुम्ही काय केलं. आम्ही करतो ते आक्रमक आणि तुम्ही करता ते काय? आक्रमक होण्याचा ठेका फक्त तुम्हालाच आहे का? आक्रमकता शिवसेनेच्या रक्तात आहे. यांनी आम्हाला आक्रमकता शिकवू नये, असंही संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतदेवेंद्र फडणवीस