मुंबई-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मुंबईतील शिवाजी पार्क येथे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्तानं शिंदे आणि फडणवीस स्मारकाची पाहणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला. हातातले खंजीर बाजूला ठेवा, मगच बाळासाहेबांच्या स्मारकासमोर हात जोडा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
"बाळासाहेब ठाकरे हे देशाचे नव्हे, तर या विश्वाचे आहेत. त्यांच्या ,स्मृतीचं दर्शन सर्वच घेऊ शकतात. त्यावर आमचा काही आक्षेप नाही. पण दर्शन घेण्याआधी आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवावेत आणि मगच स्मारकासमोर हात जोडा. बाळासाहेब ही एक अशी आत्मा आहे की ते सर्व पाहात आहेत. त्यामुळे स्मारकावर येण्यास काहीच विरोधात नाही. फक्त चांगल्या मनानं या", असं संजय राऊत म्हणाले.
श्रद्धाच्या मारेकऱ्याला भरचौकात फासावर लटकवावसईतील श्रद्धा वालकर तरुणीची दिल्लीत तिचा प्रियकर आफताब यानं निर्घृणपणे खून केल्याच्या धक्कादायक प्रकरणावरही संजय राऊत यांनी यावेळी भाष्य केलं. "श्रद्धा वालकर प्रकरण खूपच धक्कादायक आहे. ही एक विकृती नसून त्यापुढचं पाऊल आहे. अशा मारेकऱ्यांविरोधात कोर्टात खटले चालवण्यापेक्षा भर चौकात थेट फासावर लटकवलं पाहिजे. आपल्या मुलींनीही सावधपणे जगायला शिकलं पाहिजे. श्रद्धाच्या वडिलांचा आक्रोश आपण पाहिला. त्यांचा या सर्व प्रकरणाला विरोधा होता. तरीही तिनं ऐकलं नाही", असं संजय राऊत म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"