Join us  

Sanjay Raut: देश कोण विकतंय? प्रश्नांपासून पळ काढणारे प्रिय पंतप्रधान; संजय राऊतांची 'रोखठोक' टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 11:46 AM

मोदी-अदानी युतीवर राहुल गांधी यांनी संसदेत तोफखाना डागला, पण मोदी संसदेत येऊन उडवाउडवीचे व सर्व अवांतर बोलले

मुंबई-

मोदी-अदानी युतीवर राहुल गांधी यांनी संसदेत तोफखाना डागला, पण मोदी संसदेत येऊन उडवाउडवीचे व सर्व अवांतर बोलले, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'त आपल्या 'रोखठोक' या सदरातून केली आहे. राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तरे देण्यापासून पंतप्रधानांनी पलायन केले. त्यात पीएम केअर्स फंडाचे प्रकरण उसळून वर आले. देश विकला जात आहे, असाही आरोप राऊतांनी केला आहे. 

"भाजपा आणि अर्थमंत्री अदानी यांची वकिली करताना दिसतात हे आश्चर्य असून मोदी व त्यांचा पक्ष विरोधी पक्षात असताना काँग्रेस आणि गांधी परिवार देश विकत असल्याचा आरोप भाजपा करीत होता. त्यात नरेंद्र मोदी आघाडीवर होते. त्यावेळी जाहीरसभांमधून गांधी परिवार आणि काँग्रेसविरोधात तोफा डागताना मोदी एक कविता तालासुरात वाचत. मैं देश नही बिकने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा. आता हीच कविता मोदी व त्यांच्या सरकारबाबत जाहीरपणे वाचण्याची वेळ आली आहे", अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली आहे. 

राहुल गांधी यांनी संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना मोदी उत्तर देतील असं वाटलं होतं. पण मोदी यांनी अदानी यांच्याबाबत अक्षरही काढलं नाही. एलआयसी आणि सार्वजनिक बँकांचे पैसे अदानींच्या कंपनीत का टाकले यावर त्यांनी प्रकाश टाकला नाही. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. सरकार म्हणजे दुसरे कोण? तर एकमेव मोदी, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं आहे. 

"भारत कोणच्या खिशात आहे ते राहुल गांधी यांनी बेडरपणे संसदेत सांगून टाकले. मोदींनी त्यावर उत्तर देण्याचे टाळले. मोदी २०१४ पूर्वी गांधी परिवारास उद्देशून म्हणाले होते, 'मैं देश नहीं मिटने दूंगा'. आज तेच गांधी मोदींकडे पाहून बोलत आहेत..मैं देश नहीं बिकने दूंगा. पण ८ वर्षात देश बराचसा विकला गेलाय", अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

टॅग्स :संजय राऊतनरेंद्र मोदी