Join us

Sanjay Raut: बाबा, किती खोटं बोलणार, ह्रदयनाथ मंगेशकरांच्या मुद्द्यावरुन राऊतांनी हात जोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 1:57 PM

Sanjay Raut: वीर सावरकरांचं गाणं गायल्याबद्दल, त्यांनी संगीतनिर्मित्ती केल्यामुळे त्यांना आकाशवाणीची नोकरी गमावावी लागली, असं सांगितलं.

मुंबई - राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसचा समाचार घेतला. संघराज्याबद्दल घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार सांगत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसने मंगेशकर कुटुंबीयांवरही अन्याय केल्याचं मोदींनी संसदेत बोलताना म्हटलं. त्यावर, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोदींना, एखाद्याने किती खोटं बोलावं, विशेषत: घटनात्मक पदावरील व्यक्तीनं... असे म्हणत मोदींचा तो दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे.

वीर सावरकरांचं गाणं गायल्याबद्दल, त्यांनी संगीतनिर्मित्ती केल्यामुळे त्यांना आकाशवाणीची नोकरी गमावावी लागली, असं सांगितलं. पण, माझ्या आयुष्यात, मला जेव्हापासून कळायला लागलं, तेव्हापासून 'ने मजसी ने मातृभूमीने सागरा प्राण तळमळला..' हे मंगेशकरांचं गाणं मी आकाशवाणीवरच ऐकलंय. हे गाणं लोकप्रिय करण्याचं काम आकाशवाणीनंच केलंय. एखाद्या माणसानं किती खोटं बोलावं. विशेषत: एखाद्या घटनात्मक पदावरील व्यक्तीनं. पण, मी पंतप्रधानांना वंदन करतो, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, या विषयावर मी महेश केळुसकर यांचं निवेदन ऐकलं, ज्यांनी 36 वर्षे ऑल इंडिया रेडिओवर काम केलंय. जर एखाद्या संगीतकाराला, गायकाला ते गाणं वाजवलं म्हणून काढून टाकलं असेल. तर, ते गाणं ते आकाशवाणीवर वाजवणार नाहीत ना, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला. 

काय म्हणाले होते मोदी

राज्यसभेतील भाषणात मोदींनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचाही उल्लेख केला. 'लता मंगेशकर यांचं कुटुंब गोव्याचं होतं. त्यांच्या कुटुंबाला कशी वागणूक देण्यात आली ते देशाला कळायला हवं. लतादीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडिया रेडिओमधून काढण्यात आलं. त्यांचा गुन्हा इतकाच होता की त्यांनी सावरकर यांच्यावरील कविता रेडिओवर सादर केली होती,' असं मोदींनी सांगितलं होतं. मोदींच्या हा दावा खोटा असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. 

'रेडिओवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कविता सादर करण्यापूर्वी हृदयनाथ मंगेशकरांनी सावरकरांची भेट घेतली होती. त्यावेळी माझी कविता रेडिओवर सादर करून तुम्हाला तुरुंगात जायचंय का? असा प्रश्न सावरकरांनी त्यांना विचारला होता. मंगेशकरांनी याचा उल्लेख एका मुलाखतीत केला होता. हृदयनाथ यांनी सावरकरांची कविता रेडिओवर सादर केल्यानंतर पुढील ८ दिवसांत त्यांना कामावरून काढण्यात आलं,' असं मोदींनी संसदेत सांगितलं. 

टॅग्स :संजय राऊतनरेंद्र मोदीशिवसेनालता मंगेशकर