इंदिरा गांधी आणि करीम लालाच्या भेटीबाबतचे विधान संजय राऊत यांच्याकडून मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 01:47 PM2020-01-16T13:47:01+5:302020-01-16T13:49:58+5:30
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता.
मुंबई - देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला यांच्या भेटीबाबत केलेले विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी अखेर मागे घेतले आहे. मी केलेल्या वक्यव्यामुळे कुणी दुखावले असेल तर हे विधान मी मागे घेत आहे, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. एकेकाळी मुंबईत अंडरवर्ल्डचा दबदबा होता. त्यावेळी मोठमोठ्या नियुक्त्यासुद्धा या अंडरवर्ल्डच्या सल्ल्याने होत. त्याकाळात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटल्या होत्या, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
काल पुण्यात झालेल्या लोकमत पत्रकारिता पुस्कारांच्या वितरण सोहळ्यात संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्या मुलाखतीमध्ये राऊत यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. एकेकाळी मुंबईवर आणि येथील राजकारणात असलेल्या अंडरवर्ल्डच्या दबदब्याबाबत राऊत म्हणाले होते की, ''त्याकाळी छोटा शकील, दाऊद हेच ठरवायचे पोलीस कमिशनर कोण होणार, हाजी मस्तान मंत्रालयात गेल्यावर संपूर्ण मंत्रालय त्याला घ्यायला खाली यायचे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्या कुख्यात गुंड करिमा लाला याला भेटायला आल्या होत्या.'' मात्र या वक्तव्यावरून वादाला तोंड फुटले होते. अखेरीस आज मी केलेल्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधींच्या प्रतिमेस धक्का लागला आहे असे वाटत असेल तर, तसेच त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी वक्तव्य मागे घेतो, असे सांगत राऊत यांनी हा वाद संपवण्याचा प्रयत्न केला.
इंदिरा गांधी - करीम लाला भेटीबद्दल संजय राऊत बोलले ते खरं आहे का?; फडणवीसांचे काँग्रेसला पाच प्रश्न
राऊत हिंदू की मुघलांची औलाद ? : प्रसाद लाड
BLOG: ...अन् भाजपच्या सापळ्यात अडकले सारेच शिवभक्त!
तत्पूर्वी, इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यातील भेटीबाबतच्या आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना राऊत इंदिरा गांधींबाबत आपल्या मनात नेहमीच आदराची भावना असल्याचे म्हटले होते. राऊत म्हणाले होते की, ''इंदिरा गांधींबाबत आमच्या मनात नेहमीच आदराची भावना राहिली आहे. जेव्हा जेव्हा इंदिरा गांधीवर टीका झाली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. मी केलेल्या त्या विधानाबाबत म्हणायचे तर करीम लाला हे अफगाणिस्तानातून आले होते. त्यांची पश्तून ए हिंद नावाची संघटना होती. सरहद्द गांधी म्हणून ओळख असलेल्या खान अब्दुल गफ्फार खान यांच्याशी करीम लाला जोडलेले होते. त्यांना भेटण्यासाठी अनेक लोक येत. तसेच भारतातील पठाणांच्या समस्यांबाबत ते इंदिरां गांधींना भेटले होते.''