Sanjay Raut: "मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनीच उचलला"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 01:53 PM2022-04-19T13:53:48+5:302022-04-19T14:02:25+5:30
संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ''महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा काही लोकांचा डाव आहे
मुंबई - मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी गुढी पाडव्यातील मेळावा सभेत मशिदींवरील भोंग्यांवरून राज्य सरकारवर तोफ डागली. त्यानंतरच्या उत्तर सभेत राज्य सरकारला 3 मे पर्यंतचा अल्टीमेटच दिला. मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास आम्ही मंदिरावर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावू, असा इशारा जाहीर सभेत दिला. त्यामुळे, सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात राज ठाकरे केंद्रस्थानी असून राज्यात मशिदींवरील भोंग्यांचीच चर्चा झडत आहे. यासंदर्भात शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका मुलाखतीत राज ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच, हा मुद्दा शिवसेनेनेच सर्वप्रथम उचलल्याची आठवणही सांगितली.
संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. ''महाराष्ट्रात अशांतता निर्माण करण्याचा काही लोकांचा डाव आहे. मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न या देशात, महाराष्ट्रात सर्वप्रथम बाळासाहेब ठाकरेंनी उचलला आहे. त्यानंतर, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला, न्यायालयाने एक दिशादर्शक निकाल दिला आहे. त्यानुसार, महाराष्ट्रात कायदेशीर कारवाई सुरू असते. सध्या, कोणाला वातावरणच गरम करायचं आहे, म्हणून हा विषय काढायचा आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर प्रत्यक्षपणे निशाणा साधला. एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राऊत यांनी भोंग्याविषयी भाष्य केलं.
चहा उकळलेला असला तरी तो थंड होतो, कधी कधी चहापेक्षा किटली गरम असते, तसं काही किटल्या गरम झाल्यात. या किटल्या गरम झाल्या म्हणजे हिंदुत्त्वाला उकळी फुटली असं होत नाही. आम्ही जेव्हा हिंदुत्वाचं काम सुरू केला, तेव्हा अयोध्येच्या रिंगणात होतो. कुणीतरी घोडा सजवून आणला अन् आम्ही नवरदेवासारखं उभारलो, असं आमचं हिंदुत्त्व नाही, असेही राऊत यांनी म्हटले.
औरंगाबादच्या सभेची चर्चा
१ मे रोजी राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेवरून राजकारण तापलं आहे. राज यांची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे जिल्हाध्यक्ष अरविंद कांबळेंनी दिला आहे. प्रशासनानं परवानगी दिली तरीही सभा उधळून लावू, असा आक्रमक पवित्रा कांबळेंनी घेतला आहे. औरंगाबादमध्ये जोरदार सभा घ्यायची आहे. त्यासाठी तयारीला लागा, असे आदेश राज यांनी आज झालेल्या बैठकीत दिले.
अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वे मनसेचं बुकींग
मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मे पर्यंतची मुदत दिली आहे. याच दिवशी अक्षय्य तृतीया आहे. त्यामुळे राज्यभरात महाआरत्यांचं आयोजन करण्याचे आदेश राज यांनी दिले. राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. ५ जूनला राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहेत. त्यासाठी स्थानिक प्रशासनाशी चर्चा केली जाणार आहे. त्याची जबाबदारी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाईंकडे सोपवण्यात आली आहे. यासाठी १० ते १२ ट्रेन बुक केल्या जाणार आहेत. रेल्वे राज्यमंत्र्यांना पत्र देण्यात येणार आहे. याशिवाय राज यांच्या सुरक्षेसाठी गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहिण्यात येणार आहे.