Join us  

“वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपीला वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न”; संजय राऊतांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 12:32 PM

Sanjay Raut News: हा मुख्यमंत्र्यांचा खास माणूस कसा झाला. पोलिसांकडे माहिती नसेल, तर आम्ही देऊ, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Sanjay Raut News:वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात अखेर दोन दिवसांनी आरोपी मिहीर शाहला विरार येथून अटक करण्यात आली. त्याच्या मित्राने काही वेळ मोबाइल सुरू केल्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मिहीर शाहची आई आणि दोन मोठ्या बहिणींसह एका मित्राला शहापूर येथील एका रिसॉर्टमधून ताब्यात घेतले. या प्रकरणी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना, सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला आहे. 

पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सरकारकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे प्रकरण साधे नाही. जसे पुणे प्रकरणात अग्रवाल फॅमिली आहे, तशीच इथे ही फॅमिली आहे. मुलाचा जो बाप आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासा. पोलिसांकडे तो नसेल तर आम्ही देऊ. कोणत्या अंडरवर्ल्ड यांची संबंध आहेत, तो काय करतो, त्याची प्रॉपर्टी किती आहे, एवढ्या मोठ्या कार कुठून येतात  याचा तपास मुंबई पोलिसांना करावा लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

हा मुख्यमंत्र्यांचा खास माणूस कसा झाला

हा मुख्यमंत्र्यांचा खास माणूस कसा झाला. याचा संबंध अंडरवर्ल्ड गँगशी आहे. बोरिवली पोलीस ठाण्यात जाऊन त्याचा रेकॉर्ड तपासा. मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करतो की, त्याचा रेकॉर्ड समोर आणा. एकनाथ शिंदेंसोबत कोणत्या प्रकारची लोक बसली आहेत हे कळेल. यासाठी हा जो आरोपी आहे जो ड्रग्जच्या नशेत होता आणि ही नशा मेडिकल रिपोर्टमध्ये येऊ नये, यासाठी तीन दिवसांसाठी त्याला फरार केले होते आणि नंतर त्याला अटक करण्यात आली आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला. 

दरम्यान, मुंबई पोलिसांवर संशय  येऊ शकतो, केलेला प्रकार अत्यंत अमानुष आहे त्यामुळे असा व्यक्ती कारागृहातून सुटू नये. जर कोणी त्याला सोडवण्याचा प्रयत्न करेल तर रस्त्यावर उतरून लोकांनी पोलिसांना याचे उत्तर मागायला हवे. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून केला जात आहे. कारण मुलाचा जो बाप आहे, तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा नेता आहे, असे संजय राऊत म्हणाले.

 

टॅग्स :संजय राऊतवरळी