Sanjay Raut: भाजप हेच राज ठाकरेंचं प्रेरणास्थान, दौरा रद्द होताच संजय राऊतांची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 05:16 PM2022-05-20T17:16:02+5:302022-05-20T17:25:00+5:30
अयोध्या दौऱ्याला जाण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता, आता स्थगितीचाही निर्णय त्यांचाच आहे
मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वस्थामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. खुद्द राज ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली असून, पुण्यातील सभेत यावर सविस्तर भाष्य करणार असल्याचेही म्हटले आहे. या दौऱ्यासंदर्भात बोलताना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर बोचरी टिका केली. तसेच, भाजप हेच राज ठाकरेंचं प्रेरणास्थान आहे, असेही ते म्हणाले.
अयोध्या दौऱ्याला जाण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता, आता स्थगितीचाही निर्णय त्यांचाच आहे. त्यामुळे, यावर दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांनी का बोलावं? असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. तसेच, भाजपने यावर बोललं तर काहीच हरकत नाही. कारण, सध्या त्यांची ती प्रेरणा आहे, भाजप हेच त्यांचं प्रेरणास्थान आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली. हातात ढोल, नगारे, ताशा, पिपाण्या घेऊन महाराष्ट्रातील भाजप नेतेच राज यांच्या दौऱ्याला पाठिंबा देत होते. पण, युपीतील भाजप नेत्यानेच त्यांना विरोध केला, असेही राऊत यांनी म्हटले.
मी जे ऐकलं त्यानुसार राज ठाकरेंना उत्तर प्रदेशच्या जनतेनं विरोध केला आहे. त्यामुळे हा दौरा स्थगित केलाय, एवढ्यापुरताच हा विषय आहे. आदित्य ठाकरे 15 जूनला अयोध्येला जात आहेत. तो पक्षाचा दौरा असून धार्मिक आणि अध्यात्मिक आहे, राजकीय नाही. राज्यात महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करत आहे, या सरकारच्या कामाला गती मिळावी, अशी प्रार्थना आणि आरती करण्यासाठी आम्ही अयोध्येला जातोय, असेही राऊत यांनी म्हटले.
मनसेचा राऊतांना टोला
राज ठाकरेंनी जर अयोध्या दौऱ्याबाबत आमची मदत मागितली असती तर नक्कीच आम्ही केली असती, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला होता. याला मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी प्रत्युत्तर देत, संजय राऊत तुम्ही आमच्यासोबत अयोध्येला चला, आपोआप सुरक्षा मिळेल. एकटे संजय राऊत पुरेसे आहेत, या शब्दांत बाळा नांदगावकर यांनी पलटवार केला.