मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम वाढला आहे. सक्तवसुली संचलनालयाने (ED) संजय राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत अटक केली. संजय राऊत आता १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार आहेत. यातच संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केला असून, या प्रकरणी १६ सप्टेंबरपर्यंत ईडीला उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यातच संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांना अचानक मातोश्रीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलावून घेत संजय राऊत यांची विचारपूस केल्याची माहिती मिळाली आहे.
संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुनील राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे आमचे पक्षप्रमुख आहेत. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले, तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचेही प्रमुख आहेत. म्हणून मला बोलावले होते. उद्धव ठाकरे यांनी कुटुंबाची विचारपूस केली, असे सुनील राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.
सजंय राऊत यांना जामीन कधी मिळणार?
सजंय राऊत यांना जामीन कधी मिळणार, अशी प्रश्न सुनील राऊत यांना विचारण्यात आला होता. यावर, सजंय राऊत यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला आहे. मला खात्री आहे की, संजय राऊत यांच्यावर कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना लवकरात लवकर जामीन मिळेल, असा विश्वास सुनील राऊत यांनी व्यक्त केला. तसेच सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, मात्र प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस सरकार चालवत आहेत. सरकार चालवण्यासाठी आमचे मुख्यमंत्री मजबूत होते, कोरोना काळात उद्धव ठाकरे यांनी जे काम केले आहे, ते जगातला कुठलाही मुख्यमंत्री करू शकत नाही. उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नामुळेच कोरोना अटोक्यात आला, असा मोठा दावा सुनील राऊत यांनी केला.
दरम्यान, दसरा मेळावा हा शिवसेनेचा होता हा इतिहास आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. पुढे उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. कोणीही कितीही दावा केला तर ओरिजनल ते ओरिजनल आणि गद्दार ते गद्दराच राहणार आहेत, अशी टीका सुनील राऊत यांनी केली.