मुंबई - पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले असून, रविवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापेमारी केली. त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान राऊत यांना ईडीने बॅलॉर्ड इस्टेट येथील कार्यालयात चौकशीसाठी आणले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. या अटकेवर अनेक प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे.
आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत तसेच ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी ईडीला दिल्याचे समजते. मात्र, अधिकाऱ्यांना झडतीत दुसरी काही कागदपत्रे सापडली आहेत. १९ जुलै आणि २७ जुलै असे दोनदा ते ईडीच्या चौकशीला अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर, ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून राऊत यांना अटक केली. ईडी अधिकाऱ्यांसमवेत घरातून गाडीत जाताना राऊत यांनी भगवा गमछा दाखवत शिवसैनिकांना आणि माध्यमांना हात उंचावून एकप्रकारे आपला बाणा दाखवला. त्यानंतर, सोशल मीडियावर राऊत यांच्या समर्थनार्थ अनेकजण व्यक्त होत आहेत. राजकीय वर्तुळातही याचीच चर्चा आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सूचक असं ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटमधून ते संजय राऊत यांना सिंहाची उपमा देत असल्याचं दिसून येते. कारण, संजय राऊत यांना ED ने अटक केल्यानंतरच त्यांनी हे ट्वीट केलं आहे. एकंदरीत राज्यातील राजकीय घडामोडी आणि सद्यपरिस्थितीवर ते भाष्य करत असल्याचं दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं ते वाक्य आहे, जे आव्हाड यांनी शेअर केलं आहे.
गमावलेले हक्क अन्याय करणाऱ्या लोकांच्या विवेकबुद्धीला आवाहन करून परत मिळत नसतात, तर सतत संघर्षाने मिळतात. बोकडांना समारंभपूर्वक बळी दिले जाते, सिंहांना नाही!- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
८ भूखंडाची खरेदी केल्याचा ठपका
१,०३९ कोटी रुपयांच्या पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यामध्ये राऊत यांचे निकटवर्तीय आणि गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे माजी संचालक प्रवीण राऊत यांना वैयक्तिक १०० कोटी रुपयांचा लाभ झाल्याची माहिती प्रवीण यांच्या चौकशीत पुढे आली होती. तसेच, यामध्ये संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांनादेखील आर्थिक लाभ झाल्याची माहिती ईडीला मिळाली होती. याच पैशांचा वापर राऊत यांनी दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहीम येथे आठ भूखंडांची खरेदी केल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे.
...हा तर गळा घोटण्याचा डाव
संजय राऊत यांच्यावरील कारवाई हा लोकशाहीचा, विरोधकांचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. हे कारस्थान लज्जा सोडून आहे. जो हिंदूंचा, मराठी माणसाचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय, त्याचाच गळा घोटण्याचा डाव आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाहीविरोधात लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, तिथला पराक्रम काय असतो, हे दाखवून देऊ.- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना