संजय राऊत जेलबाहेर येताच मोहित कंबोज यांचं एका वाक्यात केलेले ट्विट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 07:56 PM2022-11-09T19:56:40+5:302022-11-09T19:57:01+5:30
मोहित कंबोज आणि संजय राऊत यांच्यातील कोल्ड वॉर जुनं आहे. नवाब मलिक आणि संजय राऊत यांचा उल्लेख मोहित कंबोज यांनी सलीम-जावेदची जोडी असा केला होता.
मुंबई - पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांना पीएमपीएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. ईडीने राऊतांच्या जामिनाला विरोध केला परंतु हायकोर्टाने ईडीची मागणी फेटाळून लावली. त्यानंतर १०२ दिवस आर्थर रोड तुरुंगात असलेल्या संजय राऊत यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. मी लढतच राहणार असा निर्धार राऊतांनी जेलबाहेर येताच व्यक्त केला. राऊत जेलमधून बाहेर आल्यानंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केलेले ट्विट चर्चेत आले आहे.
मोहित कंबोज आणि संजय राऊत यांच्यातील कोल्ड वॉर जुनं आहे. नवाब मलिक आणि संजय राऊत यांचा उल्लेख मोहित कंबोज यांनी सलीम-जावेदची जोडी असा केला होता. राऊत बाहेर येताच कंबोज यांनी ट्विटरवर "लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा" असं म्हणत सूचक इशारा दिला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू असताना त्यावेळी संजय पांडे यांना अटक झाली होती. तेव्हा एक संजय तुरुंगात गेला, आता दुसराही जाईल, अशा आशयाचं ट्विट कंबोज यांनी केले होते. त्यानंतर संजय राऊतांवर कारवाई झाली होती.
लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा ….
— Mohit Kamboj Bharatiya - मोहित कंबोज भारतीय (@mohitbharatiya_) November 9, 2022
मोहित कंबोज यांनी केला होता आरोप
ईडीच्या कारवाईत कष्टानं, घामाच्या पैशाने ही संपत्ती जमवली असं राऊत म्हणतात. कुठलंही उत्पन्न नसताना अद्याप ६५० हून अधिक पत्राचाळीतील लोकांना त्यांच्या हक्काची घरं मिळाली नाही. मात्र संजय राऊतांना कोट्यवधीचा फ्लॅट मिळाला. हा पैसा कुठून आला? हे पैसे प्रविण राऊतांनी जो भ्रष्टाचार केला तो कुणाच्या जीवावर केला? असा सवाल कंबोज यांनी केला होता.
'आम्ही लढणारे आहोत, लढत राहू...'
संजय राऊत तुरुंगाबाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा दिला. ते म्हणाले की, 'बाहेर आलोय, बघू आता पुढे काय होतंय. आम्ही लढणारे आहोत, लढत राहू. न्यायालयानेच माझी अटक बेकायदेशीर ठरवलीये. कार्यकर्त्यांनी कार्यक्रम ठरवला आहे, तिकडेच जातोय. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाणारच आहे अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.
शिवसेना खासदार संजय राऊत १०२ दिवसांनी आर्थर रोड तुरुंगाबाहेर, स्वागतासाठी शिवसैनिकांची प्रचंड गर्दी (फोटो - दत्ता खेडेकर) #SanjayRautpic.twitter.com/iM1ASpedNp
— Lokmat (@lokmat) November 9, 2022