'संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशाहीवर भाष्य करु शकतात'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 01:28 PM2021-03-30T13:28:35+5:302021-03-30T13:30:56+5:30
संजय राऊत यांनी शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावे, असे वक्तव्य केले होते. दुसरीकडे, शरद पवार यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
मुंबई - महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमधील घटना आणि राजकारण यांवर रोखठोकपणे भाष्य करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याबद्दल काँग्रेसमधील नाराजी वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करण्याबाबत संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी, पाटील यांनी संजय राऊत यांची खिल्ली उडवली. (congress balasaheb thorat criticised sanjay raut over sharad pawar and upa statement)
संजय राऊत यांनी शरद पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावे, असे वक्तव्य केले होते. दुसरीकडे, शरद पवार यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठी नाराजी असून, काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. यासंदर्भात चंद्रकात पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही, असे म्हणत पाटील यांनी संजय राऊतांना टोलाही लगावला.
संजय राऊत हे गेल्या वर्षभरात असे नेते निर्माण झाले आहेत की, संजय राऊत हे चंद्रावर, सूर्यावर, मंगळावर कशाहीवर भाष्य करु शकतात, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. मी सामान्य माणूस आहे, त्यांनी काय म्हटलं यावर मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही, असेही ते म्हणाले. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजपा उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी पाटील आले होते, त्यावेळी विविध विषयांवर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नांदेडधील हल्लासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना, नांदेडमधील हल्लाचं समर्थन होणार नाही, पोलिसांवरील हल्लाचं तर कधीच नाही, आम्ही सत्तेत असो किंवा नसो. पण, हा असंतोष तेथील नागरिकांमध्ये का निर्माण झाला याचा विचार ठाकरे सरकारने करावा, असेही पाटील यांनी ठाकरे सरकारला सूचवलंय.
स्थानिक शेतकऱ्यांमध्ये सरकारविरुद्ध असंतोष
स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न हा मोठा विषय आहे, महाराष्ट्रात 70 लाख लोकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यापैकी, लाखो लोक सोलापूर जिल्ह्यातील आणि हजारो शेतकरी या पंढरपूर-माढा मतदारसंघातील आहेत. पाणी असूनही केवळ वीज नसल्यानं येथील शेतकऱ्यांना पाणी वापरता येत नाही, वाढीव वीजबीलाचा हा असंतोष येथील नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच ही निवडणूक चालणार आहे. लोकांच्या मनात असलेला उद्रेक मतांच्या रुपातून बाहेर येईल, आणि आम्ही ही निवडणूक नक्की जिंकू, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलाय.
संजय राऊत राजकारणी आणि संपादक
संजय राऊत हे एका बाजूला राजकारणी आहेत. पण ते संपादकही आहेत. कदाचित राजकारणी आणि संपादक यामध्ये त्यांची गल्लत होते का काय असे वाटायला लागते. आघाडी सरकार होण्यात त्यांचा मोठा सहभाग असल्याचे आम्ही जाहीरपणे सांगत असतो, असे म्हणत युपीएचे नेतृत्व सोनिया गांधीच करणार आहेत. शेवटी काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. देशाचे नेतृत्व काँग्रेसकडे आहे आणि त्यांच्याकडेच राहणार आहे. कठीण दिवस निघून जातील आणि पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील. त्यामुळे अशी कल्पना मांडणे मला योग्य वाटत नाही. अशी वक्तव्य करून मनात दोष निर्माण होतो हे त्यांनी करू नये, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.