Join us

Sanjay Raut: “हिंमत असेल तर ईडीने घरी यावे, मला कैद करेल असे कोणतेही जेल नाही”; संजय राऊतांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 5:30 PM

Sanjay Raut: मला दोन वर्षे कैद करू शकतील, असे कोणतेही जेल बनलेले नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुंबई: PMC बँकेतील घोटाळ्याचा तपास सक्तवसुली संचालनालय (ED) करत आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांच्याही भ्रष्टाचाराचे कागद किमान तीन वेळा ईडीला पाठवले आहेत. तुम्ही एक दोन गुंठ्यांच्या लोकांना बोलावता आणि त्यांना त्रास देता. दुसरीकडे, किरिट सोमय्या ईडीच्या ऑफिसात दही खिचडी खात बसलेले असतात. ईडी भ्रष्ट आहे, ईडीचे अधिकारीही भ्रष्टाचारी आहेत. हे सगळे ईडीचे वसुली एजंट झालेत. हिंमत असेल तर ईडीने माझ्या घरी यावे. मला दोन वर्षे कैद करेल, असे कोणतेही कारागृह बनलेले नाही, असे थेट आव्हान संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले आहे. 

मुंबईत एका विशेष पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला. मुंबईत ईडीच्या नावाने ७० बिल्डरांकडून सुमारे ३०० कोटींची वसुली केली जात आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान याचा थेट भाजपाशी आर्थिक संबंध भाजपाला २० कोटी रुपये दिले. पीएमसी बँक घोटाळ्याचा आरोपी राकेश वाधवान याच्याशी किरीट सोमय्यांचे आर्थिक संबंध आहेत, असे गंभीर आरोप संजय राऊत यांनी केले आहेत. 

मला कैद करेल असे कोणतेही जेल नाही

माझ्या मुलीच्या लग्नात मेहंदी, नेलपॉलीश करणाऱ्यांचीही ईडीकडून चौकशी झाली. मी कपडे शिवले तिथेही ईडीचे लोक चौकशीसाठी गेले. बाळासाहेबांचे शब्द ज्या व्यक्तीने सामनाच्या माध्यमातून २३ वर्षे शिवसैनिक आणि सामान्य माणसासमोर आणण्याचे काम केलेली व्यक्ती म्हणजे संजय राऊत आहेत. ते भाजपच्या धमक्यांना घाबरतील, असे भाजपवाल्यांना वाटत असेल. मात्र, मी कुणाला घाबरत नाही. भाजप नेते किरिट सोमय्या सांगतात की, आता संजय राऊत यांना अटक होणार आहे. ईडीची हिंमत असेल, तर माझ्या घरी येऊन दाखवावे. मला दोन वर्षे कैद करू शकतील, असे कोणतेही जेल बनलेले नाही, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे. 

दरम्यान, ही पत्रकार परिषद आंतरराष्ट्रीय असून, शिवसेनेचे अनेक येथे माझ्यासोबत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले अनेक नेते येथे उपस्थित आहेत. महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे, त्याविरोधात रणशिंग फुंकणे आवश्यक असून, शिवसेना भवनाच्या ऐतिहासिक वास्तूपासून सुरुवात करतोय. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे फोन आले, त्यांनी आशिर्वाद दिलाय, असे संजय राऊत यांनी नमूद केले.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाराजकारण