'संजय राऊत चायनीज शिवसेनेचा नेता'; शिंदेंवरील टीकेनंतर राणेंचा बोचरा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 04:04 PM2023-06-05T16:04:28+5:302023-06-05T16:06:07+5:30
ठाकरेंची शिवसेना चायनीज आहे, या शिवसेनेचा नेता संजय राऊत आहे
शिवसेना नेते खासदार संजय राऊत सातत्याने केंद्र सरकार आणि भाजप नेत्यांवर टीका करताना दिसून येतात. तसेच, महायती सरकारला लक्ष्य करत शिंदे गटावरही निशाणा साधतात. संजय राऊतांच्या या टिकेला भाजप नेते आणि आमदार नितेश राणे पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देतात. नुकतेच राऊत यांनी शिवसेनेच्या मुखपत्रातून शिंदे गट आणि भाजपवर टीका केलीय. यासह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरुनही निशाणा साधला. आता, आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे.
ठाकरेंची शिवसेना चायनीज आहे, या शिवसेनेचा नेता संजय राऊत आहे. ही चायनीज शिवसेना असल्याने कधीही बिघडू शकते, असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर प्रहार केला. तसेच, उध्दव ठाकरे जनपथवर सोनिया गांधींना भेटायला गेले होते, याचा दाखला देत मुख्यमंत्री शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन केलेल्या टीकेवर पलटवार केला.
शरद पवार यांनी संजय राऊतांची कानातून रक्त काढेपर्यंत लायकी काढली आहे. म्हणून, संजय राऊत आता अजित पवार यांच्याबद्दल बोलत नाहीत. दरम्यान, मविआच्या एका इंटरनल सर्व्हेनुसार शिवसेनेला राज्यात केवळ २२ जागा जिंकता येतील आणि मविआ पडेल असं दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत २२ चे ०२ कसे होतील, असे म्हणत आमदार राणेंनी संजय राऊतांवर टीका केलीय.
काय म्हणाले होते संजय राऊत
शिवसेनेला कधी दिल्लीवारी करायला लागत नाही. ही खरी शिवसेना असेल, मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल तर तो दिल्लीत कशाला जाईल? मंत्रिमंडळ विस्ताराला दिल्लीत जाऊन परवानगी मागण्याची गरज काय? बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे हे दिल्लीत अर्ज घेऊन उभे राहिले नाहीत. डुप्लिकेट शिवसेनेने त्यांचा नेता कोण सांगावे. बाळासाहेब ठाकरे की मोदी-शाह आहेत ते सांगावे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे.