Aryan Khan Drugs Case: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी आता साक्षीदारानंच एनसीबीवर तोडपाणीचे आरोप केल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदास संजय राऊत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. "मुंबईत सिनेसृष्टी आहे. हे मुंबईचं वैभव आहे. बॉलीवूड कलाकारांनी मुंबई सोडून जावं म्हणूनच सिनेसृष्टीला बदनाम केलं जात आहे", असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आज या प्रकरणाशी निगडीत एका साक्षीदारानं मोठं गौप्यस्फोट केला आहे. आर्यन खानला एनसीबीनं अटक केल्यानंतर त्याला एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारा किरण गोसावी फरार झाला आहे. किरण गोसावी याचा आर्यन खानसोबतचा एक सेल्फी व्हायरल झाला होता. याच घटनेनंतर गोसावी फरार झाला आहे. पण गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करणारा प्रभाकर साईल यानं एनसीबीवरच खळबळजनक आरोप केले आहेत. एनसीबीनं ज्या दिवशी क्रूझवर कारवाई केली त्यावेळी गोसावीसोबत उपस्थित होतो, असा दावा प्रभाकर यानं केलं आहे. इतकंच नव्हे, तर एनसीबीकडून त्यावेळी घटनेचा साक्षीदार म्हणून कोऱ्या कागदांवर सह्या घेण्यात आल्या होत्या, असा गौप्यस्फोट प्रभाकर साईल यानं केला आहे. त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे.
संजय राऊत यांनी याप्रकरणात उडी घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एनसीबीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "मुंबईत सिनेसृष्टी आहे आणि ती मुंबईचं वैभव आहे. ही सिनेसृष्टी बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. एनसीबीच्या माध्यमातून हे षडयंत्र रचलं गेलं आहे. जेणेकरुन मुंबईतून या लोकांनी निघून जावं अशाप्रकारच्या षडयंत्रातून बॉलीवूडकलाकारांना लक्ष्य केलं जात आहे", असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
"सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर एनसीबी नावाचा प्रकार आहे हे दिसून आलं. मुंबई महाराष्ट्रात एनसीबी फारच कामाला लागली आहे. जणू काही मुंबई-महाराष्ट्रात अफगाणिस्तान, पाकिस्तानप्रमाणे गच्चीवर, घराघरात आणि बाल्कनीत चरस-गांजाचं पिक काढलं जातं. महाराष्ट्राचे लोक अफू-गांजाचा व्यापर करतात अशी एक बदनामी देशात केली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनं या प्रकरणात स्यूमोटो घेऊन कारवाई केली पाहिजे. तसंच याप्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली गेली पाहिजे", अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी क्रूझवरील छापेमारीवेळी जबरदस्तीनं कोऱ्या कागदावर साक्षीदार म्हणून सह्या घेण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील साक्षीदारानं केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाला आता नवं वळण प्राप्त झालं आहे. याच संदर्भात संजय राऊत यांनीही आर्यन खान आणि किरण गोसावी याचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. किरण गोसावी त्याचा मोबाइल आर्यन खान याला देत असून तो आर्यनला फोनवर काहीतरी बोलायला सांगत असल्याचं या व्हिडिओत दिसून येत आहे.