Sanjay Raut News: महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा म्हणजे तुम्ही ठोकशाहीची भाषा करत आहात. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. मग ही भाषा करुन दाखवावी. मग ठोकशाही काय आहे हे महाराष्ट्र तुम्हाला दाखवेल. ईडी, सीबीआयची हत्यारे लावून येऊ नका. तुमच्यात दम असेल तर ईडी, सीबीआय बाजूला ठेवा आणि या. मग आम्ही तुम्हाला बघतो. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊतांनीअमित शाह यांच्या दौऱ्यावरून जोरदार टीकास्त्र सोडले. गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते. तुम्ही एका गुंडाची भाषा वापरत आहात. या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासाळलेली आहे. रस्त्यावर गुंडगिरी सुरु आहे, महिलांवर अत्याचार सुरु आहेत. तुम्ही म्हणताय की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना ठोकून काढा. म्हणजे हा पराभव तुमच्या इतका आरपार गेला आहे. देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र ही भाषा सहन करणार नाही. अमित शाह यांची पुण्यातील भाषा आणि देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्री म्हणून केलेली भाषा सहन केली जाणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
आम्हाला जनतेने स्पष्ट आणि स्वच्छ मार्गाने विजयी केलेले आहे
भाजपसारख्या खोटारडेपणाच्या मशीन्स लावून आम्ही काम करत नाही. ईव्हीएमचे घोटाळे, निवडणूक रोखे आणि ईडी सीबीआयचे घोटाळे करुन आम्ही जिंकत नाही. आम्हाला जनतेने स्पष्ट आणि स्वच्छ मार्गाने विजयी केलेले आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्हीही व्यक्ती देशातील राजकारणातील सन्माननीय व्यक्ती आहेत. त्यांना महाराष्ट्राचा पराभव जिव्हारी लागला आहे. निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले. तरीही या महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा दारुण पराभव केला, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. अमित शाह यांनी पुण्यात येऊन जी मुक्ताफळ उधळली आहेत, त्यावरून हे स्पष्ट झाले आहे की, अमित शाह यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपले भाषण चुरचुरीत करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव घ्यावे लागत आहे. त्याशिवाय त्यांना भाषणाची सुरूवात करता येत नाही आणि भाषण संपवता ही येत नाही. अमित शाह यांनी भाषणावेळी ज्या भाषेचा वापर केला, ते दुर्दैवी आहे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.