Join us

Maharashtra Election 2019 : पुढच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री दिसेल, संजय राऊत यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 6:02 AM

चांद्रयान कलंडले असले तरी २४ तारखेच्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांचे यान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावार उतरल्याशिवाय राहणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.

मुंबई : पुढच्या वर्षी दसरा मेळाव्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेजारी शिवसेनेचा मुख्यमंत्री बसलेला असेल, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दसरा मेळाव्यात केला.महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या १२४ जागा आल्या असल्या तरी त्यातूनही शंभरावर जागा जिंकण्याचा निर्धार शिवसेना नेत्यांनी मंगळवारी दसरा मेळाव्यात व्यक्त केला. विशेषत: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे शंभर आमदार विधानभवनात प्रवेश करणार असल्याचे सांगत आदित्य यांच्या उपस्थितीत त्यांच्यासाठी वक्त्यांनी जोरदार बॅटिंग केली.आदित्य ठाकरे यांच्या रूपाने पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतील. निवडणुकीचा निकाल ऐतिहासिक असेल. इतिहासात मराठा वीर सीमोलंघन करून दसऱ्याचे सोने लुटत असत. शिवसेनाही आता सीमा पार करेल. या वेळी १०० पेक्षा जास्त आमदार विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली जाणार आहेत, असे सांगतानाच शिवसेनेतील नाराज झालेल्या उमेदवारांनी या महाराष्ट्रासाठी अर्ज मागे घ्यावे आणि या येणाºया भगव्या शिवशाहीचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन सुभाष देसाई यांनी केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आघाडीच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवली. सत्ता होती तेव्हा काँग्रेसने कर्जमाफी केली नाही. आता कर्जमाफीचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले जात आहे. शिवसेनेने मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

चांद्रयान कलंडले असले तरी २४ तारखेच्या निकालानंतर आदित्य ठाकरे यांचे यान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावार उतरल्याशिवाय राहणार नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला. या निवडणुकीच्या निकालानंतर आदित्य यांच्या नेतृत्वाखाली शंभर आमदार निवडून येतील. २४ तारखेला बाळासाहेब ठाकरे यांना शंभर तोफांची सलामी देऊ, असे राऊत म्हणाले.यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कार्य अहवालाचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तर, शिवसेनेचे प्रचारगीत बनविल्याबद्दल गायक, संगीतकार स्वप्निल बांदोडकर आणि अवधूत गुप्ते यांचाही सत्कार करण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्या मुख्य भाषणापूर्वी प्रकाश शेंडगे, नितीन बानुगडे-पाटील आदी नेत्यांची भाषणे झाली. आदेश बांदेकर यांनी सूत्र संचालन केले.‘काही बेड्या आहेत, जपून बोलावे लागते’युती झाली असली तरी संजय राऊत यांनी भाजपवर टोलेबाजी करण्याची संधी सोडली नाही. भाषणाच्या सुरुवातीलाच ‘काही बंधने आहेत, बेड्या आहेत, जपून बोलावे लागते. कारण आता आम्ही युतीत आहोत, अशी टपलीच राऊतांनी मारली. आमच्या मैत्रीत स्वार्थ नाही, मतलब नाही असे सांगतानाच नोटाबंदी आणि राम मंदिराच्या प्रश्नावरून त्यांनी भाजपवर निशाणा साधला. शिवसेनेने अयोध्येतील राम मंदिरावरून आवाज उठविला. त्यामुळेच इतकी वर्षे झोपलेले जागे झाले, असा टोलाही राऊत यांनी भाजप नेत्यांचे नाव न घेता मारला.राणेंना विरोध कायम : शिवसेनेने सांगितले, तर मी त्यांचा प्रचार करायला तयार आहे; पण त्यांनी युतीधर्म पाळावा, अशी गुगली नारायण राणे यांनी टाकली होती. त्याचा थेट उल्लेख न करता राऊत यांनी ‘शिवसेनेच्या विजयाची सुरूवात कणकवलीतून होईल,’ असे वक्तव्य करत राणे विरोध कायम असल्याचे दाखवून दिले. कुडाळ, नवी मुंबई, येवला येथूनही विजय मिळेल, असा दावा त्यांनी केला आणि शिवसेना सोडून गेलेल्यांना समर्थन दिले जाणार नाही, हे दाखवून देत अप्रत्यक्षपणे यातील काही ठिकाणी युती तुटल्याचे समर्थन केले.रिकाम्या खुर्च्यांची धास्तीसाडेसात वाजले तरी शिवाजी पार्कचा मोठा भाग रिकामाच होता. विशेषत: व्यासपीठाच्या उजव्या बाजूच्या खुर्च्या तशाच होत्या. व्यासपीठावरील नेत्यांमध्ये अस्वस्थता आणि कुजबूज सुरू होती. अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी सूत्रे हातात घेतली. मैदानाबाहेरील शिवसैनिकांना आत आणतानाच रिकाम्या खुर्च्या दिसणार नाहीत याची दक्षता घेतली. त्यांच्या इशाºयानंतर मागच्या बाजूच्या शिवसैनिकांनी बॅरीकेडवरून उड्या टाकत रिकाम्या खुर्च्यांचा ताबा घेतला.

टॅग्स :संजय राऊतशिवसेना