शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदार आमच्या संपर्कात, मुंबईत आल्यावर ते शिवसेनेत असतील, संजय राऊतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 02:50 PM2022-06-23T14:50:12+5:302022-06-23T14:50:41+5:30
Sanjay Raut: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई - एकनाथ शिंदें आणि त्यांच्यासोबत असलेले बंडखोर आमदार आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिकाधिक तीव्र झाला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या ४२ आमदारांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करत गुवाटीमधून जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. त्यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज इथे नसले तरी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर येतील. गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात जे राजकीय संकट सुरू आहे. त्यात मुंबईतून कोण कुठे जातंय या बातम्या दिला जात आहेत. त्यादरम्यान, शिवसेनेचे दोन आमदार कैलास पाटील आणि नितीन देशमुख इथे उपस्थित आहेत. त्यातील एक सूरतवरून आले आहेत. तर दुसरे गुवाहाटीवरून आले आहेत. त्यांना तिथून येताना त्यांना जो संघर्ष करावा लागला ती कहाणी थरारक आणि रोमांचक आहे. भाजपाने शिवसेनेच्या आमदारांना अपहरण करून फसवून नेलंय आणि त्यांना गुलाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी त्याबाबत उद्धव ठाकरेंशी वारंवार बोललो आहे. त्यांनी आता राज्यात आणि देशात किती वाईट राजकारण सुरू आहे, हे सांगावं, असे संजय राऊत म्हणाले.
त्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाल्याचा दावाही केला. ते म्हणाले की, मी इथे सांगू इच्छितो की, एकनाथ शिंदेंच्या ताब्यातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क झाला आहे. कुणी कितीही फोटो व्हिडीओ पाठवावेत. मात्र ज्या दिवशी ते मुंबईत येतील तेव्हा त्यातील २१ आमदार हे शिवसेनेचे असतील या आमदारांशी उद्धव ठाकरेंचा संपर्क झाला आहे. तसेच जर विधानसभेत हा संघर्ष आला तर तिथेही महाविकास आघाडीचा विजय होईल, इतका आम्हाला विश्वास आहे, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.