Sanjay Raut News: लोकसभेत आता २०१४ आणि २०१९ सारखी परिस्थिती नाही. राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे आम्ही कधीही सरकार पाडू शकतो. एनडीएचे सरकार स्थिर नाही. आमच्या मनात आले तर आम्ही आमचे बहुमत संसदेत सिद्ध करू शकतो. लोकसभा अध्यक्षांची निवड झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह ही जोडी नितीश कुमार तसेच चंद्रबाबू नायडू यांचा पक्ष फोडतील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लोकसभा अध्यक्षपद महत्त्वाचे आहे. चंद्राबाबू नायडूंना लोकसभा अध्यक्षपदासाठी समर्थन देण्याचा विचार करु. तेलगू देसम पक्षाच्या चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभेचे अध्यक्षपद मागितले आहे. तशी मागणीच त्यांनी एनडीएत सामील होण्यासाठी घातली होती, अशी माहिती मिळत आहे. हे अध्यक्षपद एनडीएला मिळाले नाही, तर चंद्राबाबू नायडू उमेदवार उभे करतील. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री हे टीडीपी पक्षात फूट पाडू शकतात. नितीश कुमार, चिराग पासवान, जयंत चौधरी यांचेही पक्ष भाजपा फोडू शकतो. कारण ज्यांचे मीठ खावे, त्यांच्यातच फोडाफोड करावी, ही भाजपाची परंपरा आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी हल्लाबोल केला.
राहुल गांधी आणि आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो
देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना झिडकारले आहे. नाकारले आहे. भाजपाचा पराभव केला. हुकूमशाहीचा, संविधान विरोधी कृतीचा पराभव केला. लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीने निवड होणे गरजेचे आहे. पारदर्शक पद्धतीने उपाध्यक्ष पद हे आता कायद्याने, घटनेने विरोधी पक्षाला मिळाला हवे. आता नरेंद्र मोदींचा काय तामझाम राहिलेला नाही. एनडीए सरकार टेकूवर आहे. टेकू कधीही पडू शकतो. राहुल गांधी आणि आम्ही कोणत्या क्षणी सरकार पाडू शकतो, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो. माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेते पदी निवड झालेली नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे. भाजपा संसदीय दलाच्या बैठकीत नेते पदाचा प्रश्न आला असता तर वेगळा निर्णय दिसला असता. म्हणूनच एनडीए घटक पक्षाची बैठक बोलून भाजपासह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आले ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, असे राऊत म्हणाले.