“शिवसेना आता प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार, देशभर पक्षविस्तार करणार”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 01:54 PM2022-01-24T13:54:52+5:302022-01-24T13:56:16+5:30

संजय राऊतांनी सांगितलेल्या शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

sanjay raut clears that now shiv sena contest election in all state in country and will do party expansion | “शिवसेना आता प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार, देशभर पक्षविस्तार करणार”: संजय राऊत

“शिवसेना आता प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार, देशभर पक्षविस्तार करणार”: संजय राऊत

Next

मुंबई: गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सातत्याने भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहे. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकांवरूनही शिवसेना-भाजप आमनेसामने आल्याचे दिसत आहे. अशातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता पक्षाची दिशा आणि भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना आता प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार असून, देशभरात पक्षविस्तार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दृकश्राव्य माध्यमाद्वारे संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करत युतीवर भाष्य केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेची पुढील वाटचाल, दिशा आणि भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. 

शिवसेना आता प्रत्येक राज्यात निवडणुका लढवणार

शिवसेनेची पावले आता दिल्लीच्या दिशेने पडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट संदेश दिला आहे. आम्हाला देशभर विस्तार करायचा आहे, त्यासाठी संघर्ष करण्याची अडचणीचा सामना करण्याची आमची तयारी आहे. प्रत्येक राज्यात आम्ही निवडणुका लढवू. आज यश येणार नाही. उद्या यश येईल हा विश्वास आणि आत्मविश्वास आमच्यात आहे. गोव्यात लढतोय, उत्तर प्रदेशात पाऊल ठेवले आहे. दादरा-नगर हवेलीत आम्ही लोकसभेची जागा जिंकली आहे. आम्ही दक्षिण गुजरातमध्ये काम सुरू केले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. 

आम्ही भाजपला मोकळीक दिली

बाबरीनंतर उत्तर हिंदुस्थानात शिवसेनेची एक लहर होती. उत्तर प्रदेश, हरयाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरपर्यंत आम्ही निवडणुका लढवल्या असत्या तर देशात आमचा पंतप्रधान झाला असता. पण आम्ही भाजपला मोकळीक दिली. भाजपला वाढवू दिले. आम्हाला आमची ताकद माहिती आहे. आमचा आत्मविश्वास आम्हाला घेऊन जातो. आमचा केडरबेस पक्ष आहे. आमच्याशी टक्कर दिली तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. ईडी असो, सीबीआय असो किंवा केंद्राची सत्ता असो तुम्ही कितीही आम्हाला चिरडण्याचा प्रयत्न करा, आम्ही घाबरणार नाही. आम्ही लढायला तयार आहोत, असे संजय राऊत म्हणाले.
 

Web Title: sanjay raut clears that now shiv sena contest election in all state in country and will do party expansion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.