Join us

'संजय राऊत हा विदूषक, भाषण करताना कुठल्या धुंदीत होता'

By महेश गलांडे | Published: October 26, 2020 5:32 PM

संजय राऊत हे काहीही बोलतात, जसं काय दिल्लीतील सर्व निर्णय यांनाच विचारुन होतात, अशा अविर्भावात ते बोलतात. संजय राऊत म्हणतात ही 5 वर्षे पूर्ण करणार. दुसऱ्या बाजुला म्हणतात सरकार पाडा, चर्चेचा विषय झालाय, संजय राऊत हा विदूषक आहे.

ठळक मुद्देसंजय राऊत हे काहीही बोलतात, जसं काय दिल्लीतील सर्व निर्णय यांनाच विचारुन होतात, अशा अविर्भावात ते बोलतात. संजय राऊत म्हणतात ही 5 वर्षे पूर्ण करणार. दुसऱ्या बाजुला म्हणतात सरकार पाडा, चर्चेचा विषय झालाय, संजय राऊत हा विदूषक आहे,

मुंबई - ताळमेळ नसलेलं निर्बुद्ध, शिवराळ भाषेत बरगळणं, अशा एका वाक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाचं वर्णन मी करेल. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात ना शिक्षण, ना राज्याची अर्थव्यवस्था, ना कोरोनाबद्दल, ना शेतकऱ्याबद्दल बोलल्याचं दिसलं. सध्या राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरही ते बोलले नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरेंच्या भाषणावर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणेंनी टीका केली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे राणे कुटुंबीयांवर टीका केली होती. उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राणेंना बेडुकाची उपमा दिल्यानं आता भाजपाचे नेते नारायण राणे यांनीदेखील शिवसेनेवर पलटवार केला आहे. यावेळी, खासदार संजय राऊत यांना विदूषकाची उपमा दिली. 

'संजय राऊत हेा काहीही बोलतो, जसं काय दिल्लीतीलं राजकारण यांनाच विचारुन होतं, अशा अविर्भावात बोलतो. संजय राऊत म्हणतो, सरकार 5 वर्षे पूर्ण करणार. दुसऱ्या बाजुला म्हणतो सरकार पाडा, चर्चेचा विषय झालाय, संजय राऊत हा विदूषक आहे,' अशा शब्दात नारायण राणेंनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. 25 वर्षे आमचं राज्य असेल असं म्हणतो. पहिल्यांदा म्हणतो 5 वर्षे, नंतर बोलतो 25 वर्षे. कुठल्या स्वप्नात बोलतो, का दुसऱ्या कुठल्या धुंदीत होता, असे म्हणत संजय राऊत यांच्यावर राणेंनी शाब्दीक प्रहार केला. 

भाजपासोबत युती केल्यामुळेच आमदार निवडून आले आहेत. शिवसेनेचे 56 आमदार हे मोदींच्या आशीर्वादामुळेच आले आहेत, स्वत:च्या नावावर आणि कर्तृत्वावर 25 आमदारही निवडून आले नसते. बेईमानी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, शिवसेनेचे 145 आमदार नाहीत. हिंदुत्वाला मूठमाती देत उद्धव ठाकरेंनी हे मुख्यमंत्रीपद मिळवलं, असा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला आहे. तसेच, शिवसेनेचे पुढील निवडणुकीत 10 ते 15 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत, असे भाकितही राणेंनी केले.      

कोरोना काळात घरात बसलेले मुख्यमंत्री

उद्धव ठाकरेंना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. मुख्यमंत्री पदाला हा माणूस लायक नाही. पंतप्रधानांच्या कामावर बोलण्याची त्यांची लायकी नाही. काय बोलतोय हे त्यांना कळत नाही. राज्यात 16 हजार कोटींचे उद्योग आणल्याचा उल्लेख केला तो फक्त कागदावर आहे, बेकारीचा उल्लेखच नसल्याचे नारायण राणेंनी यावेळी सांगितले. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शैलीने स्वतःची प्रतिष्ठा राखली, त्याचा काल अभाव जाणवला. निर्बुद्ध शिवराळ बरळणं म्हणजे कालचं मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं, अशी टीका नारायण राणेंनी केली. तसेच कोरोनाच्या काळात घरात बसून काम करत आहे. कोणी सांगितलं तुम्हाला की वाघ आहे. पिंजऱ्यातील आहात की पिंजऱ्याबाहेरचे, असा टोला देखील नारायण राणे यांनी लगावला आहे. 

वाघ असल्यानेच मला मुख्यमंत्री केलं. 

मी शिवसेनेत ३९ वर्षे होतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला बेडूक म्हणून नाही तर वाघ म्हणून पदं दिली. आम्ही वाघ होतो म्हणून मला मुख्यमंत्री पद दिलं, असं नारायण राणे यांनी सांगितले. नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. तसेच बाळासाहेबांमुळे आतापर्यंत शांत आहे. दादागिरी केलीत तर ‘मातोश्री’च्या आतलं आणि बाहेरचं सगळं बाहेर काढेन, असा इशारा देखील नारायण राणे यांनी दिला आहे.  

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरेनारायण राणे