''...तर भाजपावर विरोधी पक्षात बसून 'मळमळ' ओकण्याची वेळ आली नसती''

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 08:12 AM2019-12-20T08:12:21+5:302019-12-20T08:13:35+5:30

नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं चित्र सगळ्यांनीच पाहिलं.

sanjay raut commentary on devendra fadnavis | ''...तर भाजपावर विरोधी पक्षात बसून 'मळमळ' ओकण्याची वेळ आली नसती''

''...तर भाजपावर विरोधी पक्षात बसून 'मळमळ' ओकण्याची वेळ आली नसती''

Next

मुंबईः नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं चित्र सगळ्यांनीच पाहिलं. फडणवीसांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनीसुद्धा तितक्याच आक्रमकतेनं प्रत्युत्तर दिलं आहे. संत वचनांच्या ओळींनी दोघांनीही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्याच मुद्द्यावरून आता संजय राऊतांनी भाजपावर प्रहार केला आहे. 'सत्यमेव जयते' व 'प्राण जाय पर वचन न जाय' हे सगळ्यात मोठे संतवचन. हे संतवचन भाजपाने पाळले असते तर विरोधी पक्षात बसून 'मळमळ' ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर बोचरी टीका केली आहे.

कालचे सत्ताधारी विरोधी बाकावर गेले व दुसरे कोणी ध्यानीमनी नसताना सत्ताधारी बाकांवर आले म्हणून त्यांच्यात दुश्मनांचे नाते असता कामा नये, पण हे असे कसे घडले? या चिडीतून काम करणे बरे नाही. 105 आमदार निवडून येऊनही भारतीय जनता पक्ष सत्तेवर येऊ शकला नाही. ही एक पोटातली मळमळ विरोधी पक्षनेते व त्यांचे सहकारी विधानसभेत व्यक्त करीत आहेत. मळमळच ती, त्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे, असा टोलाही शिवसेनेनं भाजपाला लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखातील ठळक मुद्दे

- लोकशाही परंपरेत विरोधी पक्षाला झुकते माप मिळायला हवे, पण झुकते माप म्हणजे फक्त मळमळ ओकणे व तंगड्या झाडणे नव्हे. विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस हे सभागृहात नको तितक्या तावातावाने बोलतात,

- पण त्यांचे बोलणे बेताल आहे यावर महाराष्ट्राच्या जनतेचे एकमत झाले आहे. राज्यातले सरकार बहुमताचे आहे व विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेतला आहे. 

- पुढील वर्षभर तरी 'ठाकरे सरकार'वर अविश्वास दाखविण्याच्या भानगडीत फडणवीस यांनी पडू नये. सभागृहात संतांची वचने वगैरे ऐकवून सरकारवर टीका करण्याची भूमिका विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी नागपुरात पार पाडली, 

- 'सत्यमेव जयते' व 'प्राण जाय पर वचन न जाय' हे सगळ्यात मोठे संतवचन. हे संतवचन भाजपने पाळले असते तर विरोधी पक्षात बसून 'मळमळ' ओकण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती.

- तीन पक्षांचे सरकार हे तीन चाकी रिक्षासारखे आहे. सरकार त्रिशंकू आहे. या फडणवीसांच्या मळमळीवर मुख्यमंत्र्यांनीदेखील खणखणीत उत्तर दिले. 

- रिक्षा गरीब, बेरोजगार तरुण चालवतात. रिक्षावाल्या गोरगरीबांचे हे सरकार असून ते गरीबांसाठीच चालवले जाईल. सरकार रिक्षावाल्यांचे असून बुलेट ट्रेनवाल्यांचे नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले हे महत्त्वाचे आहे. 

- दोन्ही बाजूने संतवचनांची बरसात झाली. तुकाराम, ज्ञानेश्वर, एकनाथ, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांची शब्दसुमने मुक्तपणे उधळण्यात आली. 

- कमी बोलायचे व जास्त काम करायचे हे आपले धोरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठणकावले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विरोधी पक्षापुढे आरसा ठेवला आहे. 

- सरकार शब्दाला पक्के नाही व शेतकऱ्यांच्या तोंडास पाने पुसत आहे असे फडणवीस बोलतात. मोदी यांच्या सरकारने प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करूच हे वचन पाळले असते तर शेतकरी खूश झाला असता व परस्पर कर्जमुक्तीही झाली असती. 

- फसवणुकीचे प्रयोग भाजप सरकारने सुरू केले आहेत. आधी स्वतः दिलेली वचने पाळा. मग संतवचनांची उधळण करा. एकीकडे संत तुकारामांचा गजर करायचा व त्याच वेळी वर्तणूक 'मंबाजी'सारखी करायची. 

- विरोधी पक्षाने एकदा काय ते ठरवायला हवे. संतवचने तुकाराम महाराजांची व कृती मंबाजीसारखी. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. पण समाजात एकत्रितपणे राहायचे म्हणजे एकमेकांशी अनेक प्रकारचे संबंध येणारच. 

- हे संबंध सलोख्याचे, शिस्तबद्ध आणि समाजहितकारक असायला हवेत. म्हणजे मग त्यांचे नियमन करावयाला हवे. या कल्पनेतून आणि गरजेतूनच राज्य संस्था निर्माण झाली. 

- त्या राज्य संस्थेत विरोधी पक्षाला महत्त्व आहेच. आम्ही ते मानतो, पण कालचे सत्ताधारी विरोधी बाकावर गेले व दुसरे कोणी ध्यानीमनी नसताना सत्ताधारी बाकांवर आले म्हणून त्यांच्यात दुश्मनांचे नाते असता कामा नये, 
- पण हे असे कसे घडले? या चिडीतून काम करणे बरे नाही. विरोधी पक्षनेते सध्या संत साहित्याचा अभ्यास करीत आहेत. 

- त्यांना संतांच्याच भाषेत सांगायचे तर- ''चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रही न खाती सर्प तया''।। उद्धव ठाकरे यांचे चित्त शुद्ध आहे. त्यामुळे नवे मित्र मिळत राहतील. विरोधी पक्षाने सावधान राहावे हेच बरे! त्यांच्यातलेही बरेच जण सरकारचे मित्र बनू शकतात. कारण सरकारची नियत शुद्ध आहे!

Web Title: sanjay raut commentary on devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.