मुंबई- शिवसेना आणि भाजपाची युती होणार हे जवळपास निश्चित मानलं जातं आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा आज मुंबईत येणार असून, उद्धव ठाकरेंबरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यानंतर आज शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचीत केली आहे. ते म्हणाले, भाजपा अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संयुक्त पत्रकार परिषद घेणार असून, युतीची घोषणा करतील. त्याचदरम्यान पत्रकारांनी त्यांना जागावाटपासंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. पत्रकारांनी अब की बार, असं म्हटलं असता त्यांनी लागलीच उद्धव सरकार असं म्हटल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
तर गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी भाजपाला मित्र पक्षांचा सन्मान करण्याचा सल्ला दिला होता. भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएत असणारे पक्ष त्यांच्या राज्यात भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे तुमचा पंतप्रधान होणार असेल, तर मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांना द्या, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. 'एनडीएनं 2019 मध्ये सत्ता स्थापन केल्यास त्यात शिवसेना, अकाली दल आणि एनडीएतील मित्रपक्षांची महत्त्वाची भूमिका असेल. एनडीएतील मित्रपक्ष त्यांच्या त्यांच्या राज्यात अतिशय भक्कम स्थितीत आहेत. त्यामुळे भाजपाला जर केंद्रात मित्रपक्षांचा पाठिंबा हवा असेल, तर त्यांनी मुख्यमंत्रीपद मित्रपक्षांसाठी सोडावं,' असं राऊत यांनी म्हटलं होतं.
शिवसेना-भाजपा युती होण्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. लोकसभेच्या भाजपा 25 जागा लढणार असून, शिवसेना 23 जागा लढण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष प्रत्येकी 144 जागा लढवणार असल्याची माहिती अत्यंत विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. भाजपा पालघरची जागाही शिवसेनेला देण्यास तयार झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी युती करण्यावर शिवसेना आणि भाजपात एकमत झाले असून, सोमवारी भाजपाचे पक्षाध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.