Sanjay Raut: मुंबई केंद्रशासित करण्याचं षडयंत्र, किरीट सोमय्यांकडे नेतृत्त्व; राऊतांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 12:59 PM2022-04-08T12:59:57+5:302022-04-08T13:06:07+5:30
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमा केलेल्या निधीवरून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत
मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात चांगलाच राजकीय सामना रंगला आहे. किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांच्या संपत्तीवर टाच आणली. त्यानंतर, संजय राऊत यांनी सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. सोमय्या हे महाराष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचे सांगत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं मोठं षड्यंत्र असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
आयएनएस विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी जमा केलेल्या निधीवरून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सोमय्या राजभवनात निधी गोळा करणार होते. तो निधी गेला कुठे असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. सोमय्यांनी 58 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता 140 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचं ट्विट व्हायरल झालं आहे. दरम्यान, राऊत यांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
''मुंबई केंद्रशासित कशी करता येईल यासाठी भाजपाच्या पाच लोकांना सादरीकरण तयार केलं असून ते गृहमंत्रालयाला दिलं आहे. मुंबईतील काही धनिक, भाजपाचे नेते आणि बिल्डर यांच्या संगनमतानं हे सुरु असून किरीट सोमय्या यांचं नेतृत्व करत आहेत'', असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला आहे. भाजपाच्या पाच लोकांनी सादरीकरण तयार केलं असून या चोर, लफंग्याचं नेतृत्व किरीट सोमय्यांकडे आहे. काही करुन त्यांना मुंबईवरील मराठी माणसाचा हक्क आणि अधिकार काढायचा आहे. मुंबई वेगळी करुन मुंबईवर केंद्राचं राज्य आणायचं असून किरीट सोमय्या हा लंफगा. चोर, महाराष्ट्रद्रोही हे सादरीकरण घेऊन दिल्लीत जात असतो. आजही त्यासाठी ते दिल्लीत गेले आहेत. माझ्याकडे सबळ पुरावे आहेत,” असे गंभीर आरोप राऊत यांनी सोमय्यांवर आणि केंद्र सरकारवर केले आहेत. दरम्यान, आम्ही प्रतिकात्मक निधी जमवल्याचं स्पष्टीकरण सोमय्यांनी दिलं. यानंतर आता सोमय्यांची २०१३ मधली एक फेसबुक पोस्ट नेटकऱ्यांनी शोधून काढली आहे.
केवळ ३५ मिनिटंच निधी गोळा केला- सोमय्या
आयएनएस विक्रांतसाठी केवळ ३५ मिनिटंच निधी गोळा केल्याचं स्पष्टीकरण सोमय्यांनी दिलं. विक्रांतसाठी १० डिसेंबर २०१३ रोजी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता. ३५ मिनिटं मी निधी गोळा केला. जेमतेम १० लोकांनी डब्यात पैसे टाकले. अवघ्या ३५ मिनिटांत इतका निधी कसा काय गोळा होऊ शकतो. काँग्रेसनंदेखील भीक मांगो आंदोलन केलं होतं. त्यातून त्यांनी किती पैसे गोळा केले, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला.