Join us

“श्रीकांत शिंदे अजून बच्चा, यंदा दिल्लीत जाणार नाहीत, हिंमत असेल तर...”; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 10:58 AM

Thackeray Group Sanjay Raut News: कल्याण-डोंबिवलीत गद्दारी, अहंकार, गुंडगिरी आणि पैशांची मस्ती यांचा पराभव सामान्य शिवसैनिक १०० टक्के करतील, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

Thackeray Group Sanjay Raut News: सांगलीत स्वतः उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केला आहेत. त्यामुळे त्यावर पुनर्विचार होणे कठीण आहे. भिवंडीची जागा शरद पवारांचा पक्ष लढेल. कल्याण-डोंबिवलीमध्ये मागील वेळी श्रीकांत शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यामुळेच खासदारकी मिळाली. यंदा आता श्रीकांत शिंदे दिल्लीला पोहोचणार नाहीत, असे सांगत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली. आता तुम्ही महायुतीत आहात, तर अजून स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकलेला नाहीत आणि जिंकण्याची भाषा करत आहात. दिल्ली बहुत दूर हैं बच्चू. श्रीकांत शिंदे यंदा दिल्लीत पोहोचणार नाहीत. आमच्या सामान्य कार्यकर्ता असलेल्या वैशाली दरेकर या गद्दारी आणि अहंकार यांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय लोकांचा आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

आम्ही नारायण राणे यांचाही पराभव केला आहे

वैशाली दरेकर या सामान्य गृहिणी, सामान्य शिवसैनिक असून, गुंडगिरी, पैशांची मस्ती यांचा पराभव १०० टक्के करणार आहेत. समोर कितीही बलदंड असो. आम्ही तुमचा पराभव करू. आम्ही नारायण राणे यांचाही पराभव केला आहे. महाराष्ट्रातील मोठमोठे लोक निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांच्यासमोर हे बच्चा आहेत. हिंमत असेल तर आधी स्वतःची उमेदवारी जाहीर करा. महाराष्ट्रातील सगळ्या उमेदवाऱ्या जाहीर झाल्या. फक्त तुमचीच राहिली आहे. ठाण्यातील राहिली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मुंबईच्या सर्व सहा जागांवर महाविकास आघाडीचा विजय होईल, असा दावा संजय राऊतांनी केला. तसेच युतीमध्ये असताना युतीधर्म पाळला. आता महाविकास आघाडीत आल्यावर शिवसेनेने नेहमीच आघाडीधर्म पाळला आहे, असे संजय राऊत म्हणाले. 

टॅग्स :संजय राऊतश्रीकांत शिंदेलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४