मुंबई - सत्तास्थापनेस नकार देताना भाजपाने दिलेले निवेदन खोटे आणि खेदजनक आहे. राज्यात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी भाजपाने शिवसेनेला दोष देऊ नये. 50-50 चा फॉर्म्युला ठरल्यानंतरही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देणे हा भाजपाचा अहंकार आहे. भाजपाच्या अहंकारामुळेच राज्यावर ही वेळ ओढवली आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भाजपावर केली.
राज्यात सरकार स्थापन करण्यास नकार देणे हा भाजपाचा अहंकार आहे. हा राज्यातील जनतेचा अपमान आहे. भाजपावाले विरोधी पक्षात बसण्यास तयार आहेत. मात्र निवडणुकीपूर्वी ठरल्याप्रमाणे 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार सत्तावाटप करण्यास मात्र तयार नाहीत, अशी टीका राऊत यांनी केली.
शिवसेना आणि भाजपामधील युती जवळपास संपुष्टात आल्यानंतर आज शिवसेना नेते संजय राऊत आज पुन्हा एकदा भाजपावर सडकून टीका केली. संजय राऊत म्हणाले की, ''सत्तास्थापनेस नकार देताना भाजपाने दिलेले निवेदन खोटे आणि खेदजनक आहे. राज्यात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यासाठी भाजपाने शिवसेनेला दोष देऊ नये. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकाटिप्पणी करू नये.'' यावेळी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार देणारा भाजपा हा अहंकारी असल्याचा घणाघात राऊत यांनी केला.''शिवसेना आमच्यासोबत येण्यास तयार नाही, त्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे आता आम्ही विरोधात बसू, असे भाजपाने राज्यपालांना सांगितले. युतीची मांडणी करताना समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता. 50-50 चा फॉर्म्युला ठरल्यानंतरही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद न देणे हा भाजपाचा अहंकार आहे,''अशी टीका संजय राऊत यांनी केली.