Join us  

“शिखर बँक संदर्भात क्लीन चीट मिळणे हाच एक सगळ्यात मोठा घोटाळा”; संजय राऊतांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2024 1:15 PM

Sanjay Raut News: चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांना देवाने सुबुद्धी दिली तर दिल्लीतील सरकार कधीही कोसळेल, असा दावा संजय राऊतांनी केला.

Sanjay Raut News: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणाचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित तपास बंद करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने विशेष न्यायालयात काही महिन्यांपूर्वी अर्ज केला होता. हा अजित पवारांना मोठा दिलासा मानला जात होता. आता याप्रकरणी राज्यातील सात कारखान्यांनी मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका दाखल केल्याने पवार यांची पुन्हा डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर भाष्य करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी टीका केली.

पत्रकारांशी बोलताना विविध विषयांवर स्पष्ट भूमिका मांडत संजय राऊत यांनी शिखर बँकेच्या मुद्द्यावरून अजित पवारांवर टीका केली. शिखर बँक संदर्भात क्लीन चीट मिळणे हाच एक सगळ्यात मोठा घोटाळा आहे. अशा पद्धतीने हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप करत खटले चालवायचे. त्यासाठी  लाखो कोट्यवधी रुपये सरकारच्या खात्यातून पैसे काढून खटले चालवायचे. आणि मग त्या आरोपीने  पक्षात आला की त्याच्याबद्दल पुन्हा चांगले बोलायचे. खटला चालवताना जो काही खर्च होतो तो कोणाच्या खिशातून  घेणार नरेंद्र मोदी यांच्या का, अशी खोचक विचारणा संजय राऊतांनी केली. 

अमित शाह आणि नरेंद्र मोदी हेच खरे संविधानाची हत्या करत आहेत

विधान परिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाले, हे काँग्रेसने मान्य केले आहे. आम्हालाही तो अनुभव आला. त्यांना फार मोठ्या रकमा आणि जमिनीचे तुकडे  दिले. मतदानाला जाण्यापूर्वीच त्यांना हे देणार असल्याचे मंजूर केले होते. ही एक प्रकारची संविधान हत्या आहे. संविधानाच्या दिन साजरा करण्यासाठी ठरवले आहे. मग अशा पद्धतीने आमदारांना पैसे देऊन मत फोडणे ही संविधानाची हत्या नाही का? सरकार बेकायदेशीर आहे. आमदार अपात्र करू शकतात, त्याच पद्धतीच्या आमदारांना अशा पद्धतीने फोडणे चुकीचे आहे. अमित शाह आणि नरेंद्र मोदी हेच खरे संविधानाची हत्या करत आहे, असा मोठा आरोप संजय राऊतांनी केला.

दरम्यान, मोदी जिंकले म्हणून पेढे वाटतात , नाचत आहेत त्यांनी आपले मानसिक स्वास्थ ठीक आहे का? याची तपासणी करणे गरजेचे आहे. त्यांचे कुटुंब आणि नेत्यांना मानसिक तपासणीचे आवाहन करतो. नरेंद्र मोदी यांचा पराभव झालेला, अल्पमतात आहेत. बहुमत गमावले. त्यांच्याकडे बहुमत नाही. कुबड्यावरचे सरकार आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांना देवाने सुबुद्धी दिली तर त्यांचे  सरकार कधीही कोसळेल. जे म्हणतात मोदी जिंकले त्यांच्या बडबडण्यावर मोदी बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत, या शब्दांत संजय राऊतांनी टीका केली. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनामहाविकास आघाडी