Sanjay Raut ( Marathi News ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते खासदार रवींद्र वायकर यांना कथित जमीन घोटाळ्या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई महानगरपालिकेने गैरसमजातून वायकर यांच्याविरोधात तक्रार दिल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी वायकर यांना क्लीन चिट दिली. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
"दाऊद इब्राहीमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे. हे सरकार महाराष्ट्रातील असो किंवा दिल्लीत असो, ओवाळून टाकलेल्या सगळ्यांना आपल्या पक्षात घेत आहे. वायकर घाबरुन पळूनच गेले आहेत, आता त्यांना क्लीन चिट दिली आहे. हे कायद्याचं राज्य आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
"अशा पद्धतीने त्यांनी खोटे गुन्हे दाखल करुन त्यांनी लोकांना आपल्याकडे घेतले आहे. आमच्याकडे असणारे मंत्रीही पळून गेले आहेत. आता त्यांनी हे खोटे गुन्हे दाखल केले होते हे मान्य केले पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले. आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करता का? वायकर सारख्या लोकांचे खटले कसे मागे घेता यावर तुम्ही आता बोलावे, असंही संजय राऊत म्हणाले. असे अनेक गुन्हे त्यांनी गैरसमजातून आणि राजकीय दबावातून दाखल केले आहेत. आता ते गुन्हे मागे घ्या. वायकरांना मनस्ताप दिला आहे, त्या अधिकाऱ्यांवर आता गुन्हे दाखल केले पाहिजेत, असंही संजय राऊत म्हणाले.
आम्ही २८८ जागा लढवणार
महाविकास आघाडी एकत्र विधानसभा निवडणुका लढवणार आहे. कालच आमची महाविकास आघाडीची बैठक झाली आहे. या बैठकीत प्रमुख विषयांवर चर्चा झाली. आम्ही एकत्र लढणार आहोत. सर्वांनी 288 जागेवर लढण्याची तयारी केलेली आहे, कोणता मतदार संघ कोणाच्या वाटेला येईल हे अद्याप ठरायचं आहे, असंही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले.
"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"
शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट मिळाली आहे. गैरसमजातून मुंबई महानगरपालिकेकडून गुन्हा दाखल केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयात सी समरी रिपोर्ट दाखल करण्यात आला.