मुंबई: मी अशी भाषणे करतो की सरकारमधले आणि विरोधी पक्षातील सगळे बोलतात, तुम्ही राजीनामा द्या, हिंमत असेल तर राजीनामा द्या. माझ्या सरकारमधीलही नेते बोलतात. काल-परवा एकजण बडबडला. या भुजबळाला कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळाला बाहेर हकलून द्या, असं म्हणाला. मला त्या सर्वांना विरोधी पक्ष, स्वपक्षातील, सरकारला सांगायचे आहे. १७ नोव्हेंबरला जालनातील अंबडला रॅली झाली. १६ नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्यानंतर अंबडच्या सभेला रवाना झालो, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला.
छगन भुजबळ यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. याचदरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलं आहे. मंत्री छगन भुजबळांचा राजीनामा म्हणजे केवळ नाटक आहे. राजीनामा देऊनही भुजबळ कॅबिनेट बैठकीत सहभागी झाले, अशी टीका संजय राऊतांनी केली. संजय राऊतांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले की, छगन भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिका सरकार विरुद्ध आणि मुख्यमंत्री यांच्या विरोधी आहेत. जेव्हा मुख्यमंत्री यांच्या विरोधात कोणतरी भूमिका घेत तेव्हा त्याला मंत्री मंडळातून बरखास्त केलं जातं. ही आतापर्यंतची परंपरा आहे. छगन भुजबळ बोलत आहे की, मी राजीनामा दिला आणि राजीनामा स्वीकारला नाही आणि त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहे की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे स्पष्ट करावे लागेल, असं संजय राऊतांनी सांगितले.
मराठा आरक्षणाची मागणी गेल्या काही दिवासापासून सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीतून आरक्षणास विरोध केला आहे. यावर आता ओबीसी समाजाचे राज्यभर मेळावे सुरू आहेत. यामुळे भुजबळ यांच्या मंत्री पदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. यावर छगन भुजबळांनी मंक्षिपदाचा राजीनामा दिल्याचं विधान केलं आहे. तसेच भुजबळ साहेब यांचा आम्ही किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही राजीनामा स्वीकारलेला नाही. याबाबत मुख्यमंत्रीच सांगू शकतील, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.