महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही, राऊतांनी साधला भाजपावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 19:50 IST2019-11-03T19:44:45+5:302019-11-03T19:50:21+5:30
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायला तो काय चिवडा आहे का?,

महाराष्ट्र निवडणूक 2019: राष्ट्रपती बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही, राऊतांनी साधला भाजपावर निशाणा
मुंबईः जनतेनं स्पष्ट बहुमत देऊनही सेना-भाजपा अद्याप सत्ता स्थापन करू शकलेले नाहीत. सेना-भाजपामधील हा सत्तेचा तिढा कायम आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांना लक्ष्य करण्याचा कार्यक्रम सुरूच असतो. भाजपानं राष्ट्रपती राजवट आणायच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर शिवसेनेनंही आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करायला तो काय चिवडा आहे का?, राष्ट्रपती बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
कुणी बाजारातून चिवडा आणावा आणि वाटवा याप्रमाणे राष्ट्रपती शासन गल्लीतील चिवडा आहे काय?, राष्ट्रपती ही काही बाजारात विकायला ठेवलेली वस्तू नाही. जर पहिल्या मोठ्या पक्षाला सरकार स्थापन करता आलं नाही, तर दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलवावं लागेल. राज्यपाल राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी चर्चाही करू शकतात. त्यांच्याशी बोलून इतर पर्यायांची चाचपणी करू शकतात, असं म्हणत त्यांनी भाजपाला इशारा दिला आहे.
विधानसभेच्या निकालानंतर भाजप-शिवसेनेने राज्यपालांकडं सत्ता स्थापनेसाठी दावा सादर करायला हवा होता. तसं झालं नसून त्याला आम्ही जबाबदार नाही. भाजपाला 105 जागा मिळाल्या अन् तो सर्वात मोठा पक्ष ठरला. युती करताना काही गोष्टी ठरल्या होत्या. अडीच-अडीच वर्ष महत्त्वाच्या पदांची वाटपं झाली होती. तसेच ठरल्याप्रमाणे सत्तावाटप करायला हवं. आम्ही ठरल्याप्रमाणे मागत असून, काहीही अधिकचं मागत नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे.
तसेच आम्ही लवकरच राज्यपाल यांची भेट घेऊन त्यांना सत्तास्थापनेसाठी पक्षांना बोलावण्याची मागणी करणार आहोत. त्यांनी आधी सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलवावं आणि त्यानंतर इतर पक्षांनाही संधी द्यावी, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. भाजपाने विधानसभा निवडणुकीत बंडखोरांना ताकद दिल्याने आमच्या 20-22 जागा पडल्या. या बंडखोरीत दोन्ही पक्षांचे नुकसान झाले, असं म्हणत त्यांनी भाजपावरही टीका केली.