Sanjay Raut on Shiv Sena Dasara Melava : मुंबईत आज दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेचे दोन वेगवेगळे मेळावे पार पडत आहेत. ठाकरे गटाचा दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर सायंकाळी ५ वाजता होणार आहे. दोन्ही मेळाव्यांमधून पक्ष प्रमुख एकमेकांवर निशाणा साधणार आहेत. मात्र त्याआधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसेच शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटलं.
"दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक मेळावा होतो आणि मुंबईमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा दसरा मेळावा होता. तो परंपरेनुसार आज होईल. शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच होतो. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येतात, मेळावे करतात. ज्या शिवसेनची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली. बाळासाहेब ठाकरे विचारांचे सोने दसऱ्याला महाराष्ट्राला देत राहिले. ती परंपरा उद्धव ठाकरेंनी कायम ठेवली आहे. तुम्ही पक्षाचे चिन्ह नाव चोरलं असेल तरीही विचार आणि जनता ही मूळ शिवसेनेच्या बरोबर आहे. शिवसेना कुणाची हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही. जो निवडणूक आयोग मोदी शाहांच्या मेहरबानीवर चालतो त्यांना अधिकार नाही. मुंबईतला दसरा मेळावा विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे," असं संजय राऊत म्हणाले.
"दसरा मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकलं जाईल. पिपाण्या चालणार नाहीत. आज नक्कीच एक दिशा महाराष्ट्राला लाभेल. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठ्या विजयाची मानकरी ठरली. विधानसभाही त्याच पद्धतीने जिंकू. आमच्याकडचा धनुष्यबाण मोदी आणि शहांच्या मदतीने चोरण्यात आला. देशाचे पंतप्रधान यांना मदत करत असतील तर हा देश चोरांच्या हाती आहे असं म्हणावं लागेल. आमच्याकडे मशाल आहे आणि हे सर्वात मोठं हत्यार आहे," असंही संजय राऊत म्हणाले.
"सत्तेत बसलेले रावण मुंबई लुटण्याचे काम करत आहेत. त्यामुळे रावणाचे दहन यावेळी अखेरचं दहन असेल. त्यानंतर या महाराष्ट्रात नवीन रावण निर्माण होऊन याची काळजी आम्ही घेऊ," असे संजय राऊतांनी म्हटलं.