Sanjay Raut News: नवाब मलिक यांच्यावर सुडाने कारवाई करण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर नवाब मलिक सातत्याने बोलत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ईडी कारवाई, सीबीआय कारवाई करायला भाग पाडले. आता नवाब मलिक सरकारमध्ये आहेत. जामिनावर बाहेर आल्यानंतर नवाब मलिक विधानसभेत आले, सत्ताधारी बाकांवर बसले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे पत्र लिहिले होते. देवेंद्र फडणवीसांनी ते पत्र आता मागे घ्यावे, अशी मागणी करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीतील नेत्यांवर टीका केली.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे की नवाब मलिक यांच्यावरील सगळे आरोप खोटे आणि सुडबुद्धीने केले आहेत. नवाब मलिक विधानसभेत सत्ताधारी बाकांवर बसले, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना नीतिमत्तेचा पुळका येऊन फार मोठे पत्र लिहिले होते की, हे कसे योग्य नाही, मलिकांवर कशा केसेस आहेत? भाजपाच्या भावना बोलून दाखवल्या होत्या. देवेंद्र फडणवीस यांना ते पत्र मिळत नसेल, तर मी त्यांना ते पत्र पाठवेन. ते ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे. ते राष्ट्रभक्तीचा ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे, असा खोचक टोला लगावत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
नवाब मलिक आता ‘लाडके मलिक’
देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काय पत्र लिहिले होते ते वाचले पाहिजे. आता ठाम भूमिकेचे कसले सांगत आहात? तुम्ही मान्य करा की, मलिकांवरचे खटले खोटे आहेत. खोटारडेपणा करु नये. नवाब मलिक महायुतीत आले आहेत त्यामुळे ते आता लाडके मलिक झाले आहेत. तुम्ही नवाब मलिक यांना मांडीवरच घेऊन बसला आहात. हे ढोंगी राष्ट्रभक्त आहेत, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, महायुतीतील तीन पक्षांमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही. अजित पवार यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आणि ही शिंदे गटाची भूमिका आहे. नाहीतर यांच्या गटाला जागा कमी येणार आहेत. महायुती हा शब्द गोंडस आहे ती युती नसून संघर्ष रोज त्यांच्यात मारामाऱ्या दिसत नाहीत पण चालू आहेत. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेला आहे आपण पाहू शकतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली.