Join us

"दुर्दैवाने राज ठाकरे महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी"; पॉडकास्टवरुन संजय राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 12:37 PM

दसऱ्या निमित्ताने राज ठाकरेंनी पॉडकास्टवर केलेल्या भाषणावरुन खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Sanjay Raut on Raj Thackkeray : दसऱ्याच्या निमित्ताने राज्यात चार दसरा विविध मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि शिवसेना शिंदे गटाच्या दसऱ्या मेळावाच्या आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही पॉडकॉस्टच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जात आहे, अशी टीका केली. तसेच विधानसभा निवडणुकीत मतदानावेळी बेसावध राहू नका असं आवाहन राज ठाकरेंनी केले. राज ठाकरेंच्या पॉडकास्टवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेशी, मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र साकारण्यासाठी मला संधी द्या, असे आवाहन यावेळी राज ठाकरे यांनी केलं. महाराष्ट्र लुटण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी बेसावध न होता मतदान करावं असं राज ठाकरे यांनी म्हटलं. माध्यमांनी यावेळी यावरुनच संजय राऊत यांना सवाल विचारला. त्यावर बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्र लुटीला समर्थन दिलं असल्याचे संजय राऊत म्हणाले.

"राज ठाकरे अगदी बरोबर बोलले आहेत. महाराष्ट्र लुटण्याचे काम सुरु आहे. पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या पाठीशी राज ठाकरे दुर्दैवाने उभे राहिले होते. महाराष्ट्राची लूट दिल्लीते सत्ताधीश खास करुन मोदी आणि शाह करत आहेत. व्यापार मंडळाचे नेते. त्या व्यापाऱ्यांच्या मागे लोकसभेला जे उभे राहिले त्यांनी महाराष्ट्र लुटीला समर्थन दिलं," असं संजय राऊत यांनी म्हटलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

"महाराष्ट्राचे सोनं गेली अनेक वर्ष लुटलं जातंय आणि आपण आपट्याची पानं एकमेकांना वाटतोय. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून दुसरं काही राहत नाही. बाकीचे सगळे सोनं लुटून चालले आहेत. पण आम्ही स्वतःमध्ये मश्गूल तर कधी जातीपातीमध्ये मश्गूल. आमचं या लोकांकडे लक्ष कधी राहणार. आजचा दसरा निवडणुकीच्या तोंडावर आहे. त्यामुळे तुम्ही बेसावध राहून चालणार नाही. दरवेळी तुम्ही बेसावध राहता आणि राजकीय पक्ष आपआपले राजकीय खेळ करत राहतात. याच्यात महाराष्ट्राची प्रगती कुठे चालली आहे? नुसते रस्ते, पूल बांधणे ही प्रगती नसते.  प्रगती समाजाची व्हावी लागते. परदेशातले देश पाहतो त्याला प्रगत देश म्हणतात. आपण चाचपडत आहोत. एवढं सगळं होऊनही तुमच्यातला राग व्यक्त होताना दिसत नाही. त्याच त्याच लोकांना दरवेळी निवडून देता आणि पश्चातापाचा हात डोक्यावर मारता," असं राज ठाकरे यांनी म्हटलं. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४संजय राऊतराज ठाकरेदसरा