Sanjay Raut: 'राज्यसभेला पराभवाचं खापर फोडलं, संजय राऊतांनी आता विजयाचं श्रेयही द्याव'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 03:25 PM2022-06-20T15:25:14+5:302022-06-20T15:25:52+5:30
मी लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत आहे. याची जाणीव मी शरद पवारांपासून सर्वांना करून दिली आहे
मुंबई - राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी पराभवाचे खापर अपक्ष आमदारांवर फोडले. तीन अपक्ष आमदारांची नावेही त्यांनी उघडपणे घेतली. त्यामध्ये, देवेंद्र भुयार यांचेही नाव त्यांनी घेतले होते. त्यामुळे, देवेंद्र भुयार यांच्यासह तीनही आमदार नाराज झाले होते. त्यामुळे, विधानपरिषद निवडणुकीवेळी आमदार भुयार यांनी संजय राऊतांना चिमटा काढला आहे.
मी लोकसभा निवडणुकीपासून महाविकास आघाडीसोबत आहे. याची जाणीव मी शरद पवारांपासून सर्वांना करून दिली आहे. त्यामुळे राज्यसभेवरून आम्हा तीन आमदारांची नावे संजय राऊतांनी घेतली व दगाफटका केल्याचा आरोप केला, यावर माझ्या मतदानाचा अधिकार राऊतांनाच द्यावा, असा खोचक टोला यापूर्वी भुयार यांनी लगावला होता. संजय राऊतांना माझ्या मतदानावेळी माझ्या टेबलसमोर उभे करावे किंवा संजय राऊतांनीच माझे मतदान करावे त्यांनीच शिक्का मारावा, निवडणूक आयोगाने विशेष बाब म्हणून माझ्या मतदानाचा अधिकार संजय राऊतांनाच द्यावा अशी विनंती करणार असल्याचेही भुयार यांनी म्हटले होते. आता, मतदान केल्यानतंर भुयार यांनी राऊतांना टोला पुन्हा चिमटा काढला आहे.
राज्यसभा निवडणुकांवेळी आमच्यावर अविश्वास दाखवला गेला. मात्र, यावेळी तसा दाखवू नये. कारण, आम्ही बजरंगबलीसारखे आपली छाती फाडून दाखवू शकत नाही की, राम आमच्या छातीत आहे. गेल्या तीन दिवसांच्या तिन्ही बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी चर्चा केली. त्यानंतर, आमच्यावर अविश्वास होता, तो दूर झाल्याचे देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे. तसेच, ज्याप्रमाणे संजय राऊतांनी पराभवाचं खापर आमच्यावर फोडलं होतं, तसं यावेळी विजयाचं श्रेय आम्हाल द्यावं, असेही आमदार भुयार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होईल असा आरोप शिवसेना करत आहे. राज्यसभेला अपक्ष आमदारांनी फसविल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. यावरून अपक्ष आमदार नाराज झाले. विशेष म्हणजे हे मतदान गुप्त पद्धतीने होणार आहे. त्यामुळे शिवसेनेने आपल्या आमदारांना नेहमीच्या हॉटेलमध्ये न ठेवता दुसऱ्याच हॉटेलमध्ये ठेवले होते. आज विधानपरिषदेसाठी मतदान झाले.