मुंबई: बॉलिवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद व्यक्त केला. कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. तिने तिच्या चाहत्यांचे खूप आभारदेखील मानले. मात्र, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे कंगनाने एका मुलाखतीदरम्यान सांगितले. यावरून देशभरातून कंगनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी कंगनाला मिळालेला पद्म पुरस्कार परत घ्या, अशी मागणी केली आहे. या वादात आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी उडी घेतली आहे. कंगनाबेनने देशाची माफी मागावी, अशी मागणी संजय राऊत यांनी केले आहे.
कंगनाने केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
बेताल वक्तव्य करणारी रणौत ही अभिनेत्री आहे
शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कंगनाच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रणौत यांनी अतिशय बेजबाबदार, निराधार, स्वातंत्र्य योध्याचे अपमान करणारे हे त्याचे विधान असून त्याचा जाहीर निषेध आहे. प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असलेली त्याच्यासाठी बेताल वक्तव्य करणारी रणौत ही अभिनेत्री आहे, अशी टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
दरम्यान, देशात जेव्हा काँग्रेसचे सरकार होते, तेव्हा मला २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचे काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडले जाते. पण, हे मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात, ते तर देशाचे मुद्दे आहेत, असे कंगनाने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. कंगनाने या मुलाखतीदरम्यान आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरे स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळाले, असे कंगना म्हणाली.