“वीर सावरकर, बाळासाहेबांना भारतरत्न द्यायला हरकत नाही, राज्याने ठराव पाठवावा”: संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:13 IST2025-02-26T13:09:40+5:302025-02-26T13:13:43+5:30
Thackeray Group Sanjay Raut News: वीर सावरकर महान योद्धे, लेखक आणि कवी होते. स्वातंत्र्यवीर होते. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदूहृदयसम्राटांनी देशाला दिशा दिली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“वीर सावरकर, बाळासाहेबांना भारतरत्न द्यायला हरकत नाही, राज्याने ठराव पाठवावा”: संजय राऊत
Thackeray Group Sanjay Raut News: राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या प्रेरणादायी गीताला "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार" प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. "अनादी मी अनंत मी अवध्य मी भला, मारिला रिपु जगती असा कोण जन्मला" या ओजस्वी गीताला सन २०२५ सालचा हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
रोख दोन लाख रुपये, मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरुप आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरण दिन आहे. वीर सावरकरांनी मार्सेलिसला धैर्य वाढविण्यासाठी जे काव्य रचले, त्याल राज्य सरकारतर्फे पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला, याचा मला अतिशय आनंद आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना, या निर्णयाचे स्वागत केले आहे.
वीर सावरकर, बाळासाहेबांना भारतरत्न द्यायला हरकत नाही
वीर सावरकरांचा स्मृतीदिन आहे. वीर सावरकर महान योद्धे, लेखक आणि कवी होते. स्वातंत्र्यवीर होते. त्याविषयी कोणाच्या मनात शंका असेल तर त्यांनी इतिहास वाचावा. वीर सावरकर यांच्या गीताबद्दल जो पुरस्कार दिला जात आहे, तो स्वागतार्ह निर्णय आहे. महाराष्ट्र सरकारने एक ठराव केंद्राला पाठवायला हवा. दोन हिंदूहृदयसम्राट या देशात झाले. वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदूहृदयसम्राटांनी देशाला दिशा दिली. त्यामुळे या दोन नेत्यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणास्त्रोत मानतात, कधी बाळासाहेबांना मानतात. ते सोयीनुसार करतात. माझी अशी भूमिका आहे की, वीर सावरकरांना आणि बाळासाहेब ठाकरेंना एकाचवेळी भारतरत्न द्यायला काहीच हरकत नाही, कारण हे दोघेही देशाचे प्रेरणास्थान राहिले आहेत. महाराष्ट्राने ठराव तरी पाठवावा, मग बघू केंद्र सरकार काय करते. मतांची गणिते जुळावीत म्हणून माहिती नसलेल्या अनेक लोकांना या सरकारने भारतरत्न पुरस्काराची खिरापत वाटली. मला नावे घेऊन त्यांचा अपमान करायचा नाही. जातीय आणि राजकीय गणित जुळवण्याचा प्रयत्न आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.