मुंबई - शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी मुंबईचा 'दादा' शिवसेनाच असल्याचं विधान केल्यानंतर भाजपा नेत्यांकडून राऊतांच्या विधानावर विविध प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करताना गिधाडाची उपमा दिली आहे. 'शेर कभी गिदड की धमकी से डरा नहीं करते', असा टोला लगावत फडणवीसांनी राऊतांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. तर, राऊत यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरुन पुष्पा चित्रपटातील डायलॉग शेअर केला आहे.
"मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची ताकद पाहाच. देवेंद्र फडणवीसांना आव्हान देतोय. त्यांना माहिती आहेच मला काय सांगायचे आहे. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरात जाणंही मुश्किल होईल", असा इशारा संजय राऊत यांनी दिला. त्यावर फडणवीसांनी राऊतांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, शिवसेना-भाजपचा हा वाद चांगलाच चिघळला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांना पुण्यात मारहाण केल्यापासून दोन्ही राजकीय पक्षांत सामना रंगला आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधाला. त्यानंतर, पुन्हा ट्विट करुन भाजपवर प्रहार केला.
संजय राऊत यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग ट्विटवरुन शेअर केला आहे. तसेच, डरकाळी फोडणाऱ्या वाघाचा फोटोही त्यांनी शेअर केलाय. झुकेंगे नही... असे राऊत यांनी म्हटले आहे.
तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेल
केंद्रातील मोदी सरकार हे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ह्या गुंडांच्या टोळ्या झाल्या आहेत. सरकार पाडण्यासाठी माझ्यासह शरद पवारांनाही धमक्या दिल्या गेल्या आहेत. मात्र या सर्वांची मी पोलखोल करणार आहे. आम्हाला तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र आम्हाला तुरुंगात टाकलं तर तुम्हालाही तुरुंगात जावं लागेल, असा रोखठोक इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.
मुंबईचा दादा शिवसेना
ही मुंबई आहे, मुंबईचा दादा शिवसेना आहे. आता तुम्ही शिवसेनेची पाहाच. देवेंद्र फडणवीसांना आवाहन करतोय. त्यांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे ते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरात जाता येणार आहे. आता पुढची पत्रकार परिषद शिवसेना भवनात आणि त्यानंतरची पत्रकार परिषद ही ईडीच्या कार्यालयासमोर घेणार आहे. त्या मोठा गौप्यस्फोट करणार, असे संकेतही संजय राऊत यांनी दिले आहेत.