Sanjay Raut Letter: "काहीतरी करा, शिवसेना वाचवा!, असं सांगणारी तूच...", संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 03:06 PM2022-10-12T15:06:03+5:302022-10-12T15:07:48+5:30
गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
मुंबई-
गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी वेळेअभावी तहकूब करून पुढील सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे. संजय राऊत तुरुंगात असले तरी त्यांची लेखणी थांबलेली नाही. त्यांनी ८ ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयाबाहेर एका बाकड्यावर बसलेलं असताना मिळालेल्या मोकळ्यावेळेत आपल्या आईसाठी पत्र लिहिलं होतं. हे पत्र आता संजय राऊत यांच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट करण्यात आलं आहे.
संजय राऊत यांनी आपल्या पत्रात त्यांना झालेली अटक आणि त्यावेळीच्या प्रसंगाची कहाणी कथन केली आहे. तसंच या कठीण काळातही आई पाठिशी ठामपणे उभी होती. तसंच तिच्याकडूनच संघर्षाची शिकवण मिळाल्याचं राऊतांनी पत्रात नमूद केलं आहे. शिवसेनेतील ऐतिहासिक बंडानंतर संजय राऊत यांच्याजवळ त्यांच्या मातोश्रींनी काहीतरी करा आणि शिवसेना वाचवा अशी भावना व्यक्त केली होती याचीही आठवण राऊत यांनी पत्रातून करुन दिली आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या 'मातोश्रीं'ना लिहिलेलं पत्र जसंच्या तसं...
प्रिय आई
जय महाराष्ट्र!
खूप वर्ष पत्र लिहिण्याचा प्रसंग आला नाही. रोज सामना'साठी अग्रलेख लिहीत होतो. स्तंभ लिहीत होतो, पण दौन्यावर नसेन तेव्हा तू आणि मी रोजच भेटत होतो. दौन्यावर असताना सकाळ संध्याकाळ फोनवर बोलत होतो. त्यामुळे तुला सविस्तर पत्र लिहायचे राहून गेले. आता हे पत्र लिहिण्याची संधी केंद्र सरकारने दिली.
आताच माझी ईडी कोठडी संपली. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून तुला हे पत्र लिहीत आहे. तुला पत्र लिहिण्याचा प्रसंग अनेक वर्षांनी आलाय.
रविवारी (१ ऑगस्ट) 'ईडी'चे अधिकारी घरी घुसले तेव्हा तू मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोखाली खंबीरपणे वसून होतीस. तुझ्या खोलीची व देवघराची, तसेच किचनमधील मीठ, मसाले, पिठांच्या डब्यांची झडती घेतली तेंव्हाही तू करारी मुद्रेने सर्व सहन करत होतीस, हा प्रसंग आपल्यावर येणारच तू आहे हे तू बहुधा मनात पक्के केले होतेस. पण संध्याकाळी मला घेऊन जाताना तू मला मिठी मारलीस व रडलीस. तुला अचानक हुंदका फुटला! बाहेर असंख्य शिवसैनिक घोषणा देत होते. त्या गर्जनांतही तुझा हुंदका माझ्या मनात घुसला. 'लवकर परत ये म्हणालीस. खिडकीतून मला हात केलास. जसा तू रोज 'सामना'त किंवा दौऱ्यावर जाताना करतेस. त्या कठीण परिस्थितीतही अश्रू रोखून तू बाहेर जमलेल्या शिवसैनिकांनाही हात केलास. मला घेऊन जाणारी गाडी बाहेर पडेपर्यंत तुझा हात वरच होता.
आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही. देशासाठी लढणारे हजारो सैनिक सीमेवर उभे असतात आणि ते महिनोन महिने घरी येत नाहीत. काही जण तर कधीच येत नाहीत. लढाई तर अशीच असते. मलाही अन्यायापुढे, शिवसेनेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुश्मनांपुढे झुकता येत नाही. अन्यायाविरोधात मी लढा देत आहे. म्हणूनच मला तुझ्यापासून दूर जावे लागले. हा कणखरपणा व कठोरपणा मी तुझ्याकडूनच घेतला नाही कायर भुजबळ, राणे शिवसेना सोडून गेले तेव्हाही तुझ्यातला त्रागा मी पाहिलाय. आता पुन्हा शिंदे नावाचा गट फुटून उद्धव ठाकरेंवर हल्ले करू लागला तेव्हा "काहीतरी करा, शिवसेना वाचवा!" असे सांगणारी तूच होतीस. "हे लोक का फुटले? यांना काय कमी पडलं होतं?" असा प्रश्नही तू बातम्या पाहून विचारीत होतीस. शिवसेना वाचवायची, टिकवायची म्हणजे लढावेच लागेल. प्रत्येक वेळेस वीर शिवाजी शेजाऱ्यांच्याच घरात का जन्माला यावा? हा प्रश्न असतोच.
शिवसेनेचे व स्वाभिमानाचे बाळकडू मी तुझ्याकडूनच घेतले. महाठी वाणा मी तुझ्याकडूनच शिकलो. शिवसेनेशी व बाळासाहेबांशी कधीच बेइमानी करायची नाही, हे तूच आमच्या मनावर कोरलेस! मग आता त्या मूल्यांसाठी लढण्याची वेळ आली आणि त्यात 'संजय' कमजोर पडला, शरण गेला तर बाहेर काय तोंड दाखवू? मी गुडघे टेकलेले तुलाच मान्य झाले नसते. 'ईडी', 'इन्कम टॅक्स' वगैरेच्या भयाने बरेच आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले. मला बेइमानांच्या यादीत जायचे नाही. कोणीतरी खंबीरपणे उभे राहायलाच हवे. माझ्यात ती हिंमत आहे. ती हिंमत माननीय बाळासाहेब आणि तू दिलीस. सगळ्यांना माहीत आहे, माझ्यावर बनावट व खोटे आरोप लावले. इथे माझ्यासमोर अनेकांकडून दहशत व दबावाने अगदी गन पॉइंट वर माझ्याविरुद्ध बोगस स्टेटमेंट घेतल्या जात आहेत. अप्रत्यक्षपणे ठाकत्र्यांची साथ सोडा असे सुचवले जात आहे. याच प्रकारचा जुलूम टिळक, सावरकरांसह अनेकांना भोगावा लागला. अनेक शिवसैनिकांनी पक्षासाठी आपल्या घरादारांवर तुळशीपत्र ठेवले, जायबंदी झाले, प्राण गमावले. मग तोच पक्ष संकटात असताना माझ्यासारख्या त्यांच्या नेत्याने रणांगणातून पळ कसा काढावा? का झुकावे? उद्धव ठाकरे हे माझे जिवाभावाचे मित्र व सेनापती आहेत. अशा कठीण काळात मी त्यांना सोडले तर मी उद्या बाळासाहेबांना काय तोंड दाखवू?
आज कारस्थानी लोकांच्या हाती राजशकट सापडले आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व व महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा आहे. पडद्यामागे बरेच काही चालले आहे. अशा वेळी मान खाली घालून, हात बांधून एखाद्या गुलामासारखे कसे जगता येईल? मी आताच ऐकले, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया व राहुल गांधींचाही छळ सुरू आहे. रोहित पवार यांनाही त्रास दिला जातोय. या छळातूनच नव्या क्रांतीच्या ठिणग्या उडतील व नव्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होईल. लोकशाहीचा पुन्हा जन्म होईल.
जशी तू माझी आई आहेस तशी शिवसेनादेखील आपल्या सगळ्यांची आई आहे. आईशी बेइमानी करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. सरकारविरुद्ध बोलू नका, महाग पडेल. अशा धमक्या होत्या. हा दबाव आणि धमक्यांना मी भीक घातली नाही या एकाच कारणासाठी मी आज तुझ्यापासून लांब आहे. तरीही चिंता नसावी, मी येईनच. तोपर्यंत उद्धव ठाकरे व असंख्य शिवसैनिक तुझी मुले असतील. काळजी घे!
कळावे,
तुझा,
संजय (बंधू) ८ ऑगस्ट सत्र न्यायालय