Sanjay Raut Emotional Video: संजय राऊत ED कार्यालयात निघताना आईने मारली घट्ट मिठी, तुम्ही पाहिलात का भावनिक व्हिडीओ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 11:23 PM2022-07-31T23:23:29+5:302022-07-31T23:25:11+5:30
Sanjay Raut Emotional Video with mother: आईने लेकाला मिठी मारताच दोघांनाही अश्रू अनावर झाले पण...
Sanjay Raut Mother: गोरेगावच्या पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी झालेल्या गैरव्यवहारात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या भांडुपच्या निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास कसून चौकशी केल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात घेऊन जाण्यात आले. सकाळी ७ वाजताच्या सुमारास ईडीचे ८ ते १० अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. त्यानंतर त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आणि अखेर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संजय राऊतांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. यावेळी संजय राऊतांनी आपल्या कुटुंबीयांचा अतिशय भावनिक पद्धतीने निरोप घेतला. आपल्या मातोश्रींना तर त्यांनी घट्ट मिठी मारली. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्या मातोश्रींना आणि कुटुंबीयांना अश्रू अनावर झाल्याचे दिसले. संजय राऊत जेव्हा ईडीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांनी आपल्या आईला घट्ट मिठी मारली. तत्पूर्वी त्यांच्या आईने पारंपरिक पद्धतीने त्यांचे औक्षण केले. त्यावेळी राऊत माय-लेकाच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे दिसून आले. पण भावनांना आवर घालत संजय राऊत यांनी 'आईची काळजी घ्या' असे कुटुंबीयांना सांगितले आणि घरातील इतरांचा निरोप घेऊन ते ईडीच्या वाहनात बसण्यासाठी खाली उतरले. पाहा राऊत माय-लेकाचा भावनिक व्हिडीओ-
--
संजय राऊतांच्या आईने त्यांचे औक्षण केले...
दरम्यान, संजय राऊतांना ताब्यात घेतले आणि ईडी कार्यालयाच्या दिशेने त्यांना घेऊन जाण्यात आले. यावेळी संजय राऊत जेव्हा घरातून खाली उतरले तेव्हा त्यांच्या मातोश्री खिडकीत उभ्या असल्याचे दिसले. आपल्या मुलाला केंद्रीय तपास यंत्रणांनी ताब्यात घेतल्याचे पाहिल्याने त्या माऊलीला अश्रू अनावर झाले. अनेक प्रसारमाध्यमांनी तो भावनिक क्षण कॅमेऱ्यातही टिपला. संजय राऊतांच्या मातोश्री, त्यांच्या पत्नी वर्षा राऊत आणि त्यांच्या भगिनी सर्व जण घराच्या खिडकीत उभ्या असल्याचे दिसले. यावेळी संजय राऊत यांच्या मातोश्रींच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. पण काही वेळाने त्यांनी आपल्या भावना आवरल्या आणि आपल्या मुलाच्या पाठीशी उभ्या असलेल्या शिवसैनिकांना अभिवादन केले.
संजय राऊत यांना ईडीने चार वेळा समन्स बजावले होते. त्यांपैकी केवळ एकदाच ते चौकशीसाठी हजर राहिले. त्यानंतर ते चौकशीला गेले नाहीत. त्यामुळे तपासात सहाकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत ईडीचे अधिकारी आज राऊतांच्या घरी आले. त्यांच्या भांडुप येथील घरी त्यांनी राऊत यांची चौकशी केली, तसेच त्यांची पत्नी वर्षा राऊत यांचीही चौकशी करण्यात आली.