मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत दररोज सकाळी माध्यमांशी संवाद साधत असतात. राज्यातील चालू घडामोडी आणि राजकीय परिस्थितीवर ते भाष्य करतात. सध्या राज्यात राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha Election 2022) रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार तीन तर भाजप दोन जागांवर सहज विजय मिळवू शकतात. पण, सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. यात काही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी, रवि राणांचं नाव येताच ते चिडल्याचं दिसून आलं.
शिवसेनेचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले. तर, शिवसेनेला स्वत:च्या आमदारांवर विश्वास नाही का? असा सवाल पत्रकाराने संजय राऊत यांना केला होता. त्यावेळी, रवि राणा यांचा संदर्भ देण्यात आला. त्यावर, संजय राऊत चिडल्याचे दिसून आले. सकाळ-सकाळ कोणाचं नाव घेताय तुम्ही... असे म्हणत संजय राऊत यांनी राणांसंदर्भातील तो विषय टाळला. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दोन आणि महाविकास आघाडीच्या चारही जागा निवडून येतील, असेही राऊत यांनी म्हटले.
कोण काय बोलतंय, कोण काय टोमणे मारतंय, कोण काय पिना मारतंय यात जाऊ नका. 10 तारखेला तुम्हाला रात्री 8 वाजता निकाल स्पष्ट झालेले असतील, असेही राऊत यांनी म्हटले.
'राज्यसभेचे मतदान किचकट'
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. या निवडणुकीत आमदार फुटू नयेत, याची प्रत्येक पक्ष काळजी घेत आहे. दरम्यान, शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवले, याबाबत संजय राऊत म्हणाले, 'राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया ही तांत्रिक आणि किचकट असते. हे मतदान नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने असते. त्याबाबत आमदारांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे. महाराष्ट्र मोठं राज्य आहे, डोंगर, दऱ्या-खोऱ्यांचा प्रदेश आहे. आमदार लांबून येत असतात. त्यामुळे, ही सोय केल्याचंही त्यांनी सांगितलं.
आमदारांना ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवणार
वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेच्या आमदारांना सोमवारी रात्री मार्वे बीचवरील 'द रिट्रीट' हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. या आमदारांना मंगळवारी दुपारी विधानभवनापासून काही अंतरावर असलेल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये हलवण्यात येईल. शिवसेनेच्या जवळपास २५ आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्यसभा निवडणुकीत कोणताही दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेकडून हे पाऊल उचलण्याची आल्याची चर्चा आहे.
असे आहे मतांचे गणित
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडे मिळून 26 अतिरिक्त मतं आहेत. मात्र उर्वरित 16 मतांसाठी त्यांना महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष, छोटे पक्ष आणि इतरांच्या पाठिंब्याची गरज आहे. तर भाजपाकडे स्वत:ची 22 अतिरिक्त मतं असून, अन्य 7 आमदारांचा पाठिंबा धरता एकूण 29 मते आहेत. उर्वरित 13 मतांसाठी भाजपाचा महाविकास आघाडीचे मित्र असलेले छोटे पक्ष आणि अपक्षांवर डोळा आहे.