"राज ठाकरेंच्या भोंग्यांना पावर कुणाची हे सर्वांना ठावूक", संजय राऊतांची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 11:23 AM2022-05-02T11:23:30+5:302022-05-02T11:24:14+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याबाबत ४ मेची डेडलाइन दिली आहे. मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाहीत तर मशिदीसमोरच दुप्पट आवाजात लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा दिला आहे.
मुंबई-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटविण्याबाबत ४ मेची डेडलाइन दिली आहे. मशिदीवरील भोंगे हटवले गेले नाहीत तर मशिदीसमोरच दुप्पट आवाजात लाउडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि सरकारसमोर आता तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर नाव न घेता सडेतोड टीका केली. "भोंग्यांना पावर कुणाची आहे हे सर्वांना ठावूक आहे. त्यामुळे याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही", असं संजय राऊत म्हणाले.
"महाराष्ट्र हे काही लेच्यापेच्यांचं राज्य नाही. अल्टीमेटम वगैरे देऊन काही इथली परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही. इथं गृहमंत्री आहेत. लोकनियुक्त सरकार आहे. त्यामुळे काय करायचं हे त्यांना माहित आहे. मशिदीवरील भोंगे हा कायद्याचा विषय आहे. हायकोर्टानं काय सांगितलंय, सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं आहे. याचा विचार करुन काम होईल. तुमच्या हातात काही काम नाही. म्हणून देशाचं वातावरण खराब करण्याचं काम तुम्ही करत आहात. यांच्या भोंग्यामागे कुणाची इलेक्ट्रिसिटी आहे हे सर्वांना माहित आहे. स्वत:च्या राजकीय हितासाठी वातावरण बिघडवणं योग्य नाही. हे राष्ट्राला मारक आहे. या देशात जर कायद्याचं राज्य असेल तर प्रत्येकानं त्याचं पालन केलं पाहिजे", असं संजय राऊत म्हणाले.
बाबरीच्या मुद्द्यावरुन फडणवीसांना टोला
बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरुनही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. "बाबरी पाडताना शिवसेना कुठे होती हे विचारणाऱ्या फडणवीसांनी हा प्रश्न त्यांच्या पक्षातील नेत्यांनाच विचारावा. सर्व माहिती मिळेल. सीबीआयनं केलेल्या तपासाची पानं वाचावीत. ती वाचली तर शिवसेना कुठे होती ते कळेल. बाबरीचा प्रश्न सुटलेला आहे. राम मंदिरही उभं राहतंय. मग इतक्या वर्षांनी पुन्हा बाबरीची फुलबाजी काढण्याची गरज काय?", असं संजय राऊत म्हणाले. सध्याचं वातावरण बदललं आहे. प्रश्नही बदलले आहेत. मूळ प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हे असले विषय काढले जात आहे. पण लोक यात पडणार नाहीत, असंही राऊत म्हणाले.