Join us

संजय राऊतांना जामीन मिळाला अन् सुषमा अंधारेंच्या डोळ्यात पाणी आलं; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 4:30 PM

काळ पालटणार नाही असं ज्यांना वाटलं त्यांना कळालं असेल शिवसेना विचार आहे कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीने तेवढेच आमदार आणण्याची ताकद ठेवते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

मुंबई - पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर १०० दिवसांनी जामीन मिळाला आहे. संजय राऊतांच्या जामीनानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. कोर्टात ईडीने राऊतांच्या जामीनाला स्थगिती द्यावी अशी मागणी लावून धरली परंतु कोर्टाने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आता संजय राऊत यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राऊतांना मिळालेल्या जामिनामुळे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. 

सुषमा अंधारे(Sushma Andhare) म्हणाल्या की, आम्ही सगळे जण आनंद व्यक्त करण्यासाठी जमलो आहोत. टायगर इज बॅक, हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे. तब्बल १०२ दिवसांनी आमच्या कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य बाहेर येत आहे. मरण पत्करेन, शरण नाही असं सांगणारा आमचा नेता परतला आहे. लढाई सुरू असताना सेनापती, सरदार असणे गरजेचे असते. बाळासाहेबांचा सरदार कधीही डगमगत नाही याचा वस्तूपाठ राऊतांनी घालून दिला. त्या ४० लोकांनी थोडासा धीर धरला असता, विश्वास ठेवला असता तर आज चित्र वेगळे असते. राऊतांनी कर नाही डर कशाला म्हणत सामोरे गेले. काळ पालटणार नाही असं ज्यांना वाटलं त्यांना कळालं असेल शिवसेना विचार आहे कधीही संपणार नाही. शिवसेना दुपटीने तेवढेच आमदार आणण्याची ताकद ठेवते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

तसेच संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यासारखा सरदार आमच्यासोबत असल्याने घाबरण्याची गरज नाही. पुन्हा पहाट दिसतेय. सूर्य उगवत आहे. गद्दारांचे डोळे दिपणार आहेत. संजय राऊतांच्या येण्यानं सगळीकडे आनंद पसरला आहे. राऊत हिरा आहेत. तो हिरा परत आलेला आहे. सण, उत्सव तेव्हाच असतो जेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य आपल्यासोबत असतो. आमच्या कुटुंबातील एक सदस्यच आमच्यासोबत नव्हता. त्यामुळे आज आमच्यासाठी सण, उत्सव आहे. शिवसेनेसाठी हा आनंदाचा दिवस आहे. उद्धव ठाकरेंवर चिखलफेक केले गेले. शिवसेना संपवण्याची भाषा कुणीही केली नव्हती. रात्रीच्या अंधारात जे पळून गेले त्यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली असं सांगत सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात पाणी आले. 

सत्यमेव जयते - सुनील राऊत आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. राज्यातील जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर न्यायालयाने संजय राऊतांना जामीन दिला. शिवसेनेचा भगवा झेंडा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर फडकवण्याचा निर्धार आम्ही करणार आहोत अशी प्रतिक्रिया संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संजय राऊतशिवसेनासुषमा अंधारे