मुंबई-
विधान परिषदेतील १२ आमदारांच्या नियुक्तीचा वाद आता पुन्हा एकदा विकोपाला जाताना दिसून येत आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीच्या निवडणुकीला राज्यपालांनी परवानगी नाकारल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना रोखठोक पत्र लिहिलं होतं. आता मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करत आपल्या भावना पत्रातून व्यक्त केल्या. त्यावर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही खोचक शब्दात भाष्य केलं आहे.
"सतत्या दबावामुळे राज्यपाल दु:खी आहेत. त्यांच्या वेदनेत आमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राची जनता सहभागी आहे. त्यांच्यावर केंद्रातील कोणत्या नेत्याचा दबाव आहे हे त्यांनी सांगून टाकावं", असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांनी उपरोधिकपणे राज्यपालांवर टीका केली. "राज्यपाल हे सदगृहस्थ आहेत. अनेक वर्ष ते राजकारणात आहेत. ते एका राज्याचे मुख्यमंत्री होते. आम्ही कालच एका सोहळ्यात भेटलो. गप्पा देखील मारल्या. त्यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. त्यांच्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही. राज्यपाल घटनेचं पालन करणारं प्रमुख पद आहे. ते राज्यात आल्यापासून आम्ही त्यांचा आदरच करत आहोत. त्यांचा अनादर व्हावा असं कोणतंही कृत्य सरकारच्या कोणत्याही मंत्र्यानं किंवा मुख्यमंत्र्यांनी कधीच केलेलं नाही", असं संजय राऊत म्हणाले.
"राज्यपाल जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा आम्ही आदरानं त्यांचं स्वागत केलं. ते देखील राजभवनावर गेल्यावर प्रेमाने आदर सत्कार करतात. पण त्यांच्यावर दबाव कोण आणतंय ते त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे. ते त्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. १२ सदस्यांच्या संदर्भात एक वर्षापासून विषय प्रलंबित आहे. तिथून ठिणगी पडली आहे. मंत्रिमंडळानं केलेल्या शिफारसी राज्यपालांनी स्विकारायच्या असतात अशी आपली घटना सांगते. मग राष्ट्रपती नियुक्त सदस्य असतील किंवा मग राज्यपाल नियुक्त सदस्य. राज्यपालांवर केंद्राकडून कुणी दबाव आणतंय का? राज्यपालांवर दबाव आणून काम करुन घेणं हे योग्य नाही", असंही संजय राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी आम्ही राज्यपालांकडे परवानगी मागितली होती. ती त्यांनी दिली नाही. त्यामुळे निवडणूक थांबली आहे. त्यामुळे आमच्याविषयी नाराजी असण्याचं कारणच नाही, असं संजय राऊत म्हणाले. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी लिहिलेलं पत्र हे तर राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील प्रेमपत्राचाच भाग आहे. अशी पत्र मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये होत असतात. पश्चिम बंगालमध्ये काय चाललंय? शेवटी हे असं राजकारण होत असतं. त्याचं इतकं मनावर घेऊ नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.