मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणूक लढवणार आहे अशी चर्चा सुरू आहे. शिवसेना नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आगामी विधानसभेची निवडणूक लढविणार असून त्याचदृष्टीने पक्षाने पाऊलं टाकण्यात सुरूवात केली आहे. आदित्य ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याचं कामदेखील सुरू आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे कुठून निवडणूक लढविणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
अशातच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढविण्यावर भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवावी ही शिवसेनेची आणि शिवसैनिकांची इच्छा आहे. संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. महाराष्ट्रात ते जनआशीर्वाद यात्रा काढत आहे. लाखोंच्या संख्येने त्यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळत आहे. मराठवाडा, कोकण, विदर्भ सगळीकडे त्यांच्या यात्रेला प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाला आहे असं राऊतांनी सांगितले.
इतकचं नाही तर तरूण बाळासाहेब आम्ही पाहिले आहे. बाळासाहेब जेव्हा राज्यात फिरत होते तेव्हा असाच प्रचंड उत्साह आणि प्रतिसाद त्यांना मिळत होता. जे वातावरण आता दिसत आहे तसे वातावरण बाळासाहेब राज्यात फिरताना होते असं सांगत आदित्य ठाकरे यांचे भरभरून कौतुकही केलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चितच झालं आहे. सध्या अनेक राजकीय नेते पक्ष सोडून जात आहेत यावर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत पक्षांतरावर बोलणं टाळलं पाहिजे. कोण कुठल्या पक्षात जाईल हे आता सांगता येणे कठीण आहे त्यामुळे यावर कोणीही बोलू नये असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
गेल्या काही दिवसांपासून वरळी विधानसभा जागेवरून आदित्य ठाकरे लढणार असल्याचे बोलले जात आहे. वरळी आदर्श नगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रवक्ते आमदार अनिल परब यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. तसेच आदित्या ठाकरे यांना वरळीतून उमेदवारी देण्याची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.